उद्धव ऊर्फ उदया मजल्या भोसले, आसाब दस्तगीर शेख आणि विशाल मिलिंद पारधे अशी आरोपी कैद्यांची नावे आहेत. विविध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात तिन्ही कैदी हर्सूल कारागृहात काही महिन्यांपासून आहेत. प्रयत्न करूनही त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केलेला नाही. यामुळे त्यांनी युक्ती लढवून त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे बनावट आदेश तयार करून जेल प्रशासनाला पाठविण्याचा निर्णय घेतला. १ जानेवारी रोजी त्यांच्यापैकी एकाला वैद्यकीय तपासणीकरिता घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तेव्हा त्याने कोरे आदेश मिळविले. यानंतर त्याने हे आदेश त्यांच्यासोबतच्या जेल पोलिसांची नजर चुकवून दोन आदेश जेल प्रशासनाच्या पत्रपेटीत टाकले. तिसरे आदेश टाकत असताना तो पकडला गेला. यावेळी पोलिसांना हा प्रकार समजला. त्याला जेल अधीक्षक यांच्या समोर हजर केले असता त्याने त्यांच्या साथीदारांना जेलबाहेर पडण्यासाठी बनावट जामीनपत्राची शक्कल लढविल्याची कबुली दिली. या प्रकरणी तुरुंग अधिकारी ईर्शाद याकुब सय्यद यांनी आरोपी तीन कैद्यांविरुद्ध हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक अतुल ठोकळ तपास करीत आहेत.
बनावट जामीनपत्र जेलरला पाठविणाऱ्या तीन कैद्यांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:19 IST