तुळजापूर : विक्री केलेल्या सीमकार्डची व्यवस्थित नोंद न ठेवल्याप्रकरणी तीन सीमकार्ड विक्रेत्यांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई सोमवारी तुळजापूर शहरात करण्यात आली़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून सर्व मोबाईल सीमकार्ड विक्रेत्यांना त्यांनी विक्री केलेल्या सीमकार्डची योग्य नोंद स्वत:जवळ आणि जवळील पोलीस ठाण्यात दाखल करण्याबाबत अप्पर जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी आदेश दिलेले आहेत़ त्याची माहिती न ठेवल्यामुळे आणि विक्री संदर्भातील माहिती यादी स्वरुपात न दिल्याने दहशतवादविरोधी पथकाने शहरातील तीन सीमकार्ड विक्रेत्यांविरूध्द कारवाई केली़ यात पुष्पहविहार मोबाईल शॉपीचे करण दत्ता हावळे (रा. बोरी), सिध्दी मोबाईल शॉपीचे दिनेश बबन शिंदे (रा.दयानंद नगर, तुळजापूर) व समाधान मोबाईल शॉपीचे शाहूराज प्रकाश शेवाळे (रा.सोलापूर रोड, तुळजापूर) या तिघाविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या कारवाईमुळे सिमकार्ड विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे़ (वार्ताहर)
सीमकार्ड विक्रेत्या तिघांविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: February 28, 2017 00:54 IST