बदनापूर : जमीन मोजण्याकरीता पोलिस संरक्षण देण्यासाठी शेतकऱ्यांकडून २५ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर उमाकांत पटवारी विरूद्ध दोन वेळा लाच लुचपत प्रतिबधक विभागाने लावलेला सापळा अयशस्वी झाला. मात्र चौकशीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने गुरूवारी पटवारी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील वरूडी येथील अब्दुल लतीफ यांच्या शेतजमीनीची मोजणी २० मार्च रोजी करण्यात येणार होती. त्यासाठी पोलिस बंदोबस्ताची आवश्यकता असल्याने त्यांनी पोलिस निरीक्षक पटवारी यांना भेटून बंदोबस्त देण्याची मागणी करून त्यासाठी नियमानुसार बंदोबस्ताची शासकीय फि देण्यास तयार असल्याचे सांगितले होते. मात्र पटवारी यांनी या कामांसाठी २५ हजाराची मागणी केली. व ते दिल्याशिवाय बंदोबस्त पुरविणार नसल्याचे सांगितले.१२ मार्च रोजी येथील पोलीस ठाण्याच्या आवारातील विश्रामगृह येथे पटवारी यांनी शासकीय काम करून देण्यासाठी ३० हजार रूपयांची मागणी करून तडजोडीअंती २५ हजार रूपयाची मागणी करून स्विकारण्यास कबुल झाल्याचे निष्पन्न झाले आहे.दरम्यान पटवारी यांनी लाचेची मागणी केल्याने तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार या विभागाचे उपअधीक्षक प्रताप शिकारे, पो.नि. व्ही. बी. चिंचोले व त्यांच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी करून १३ मार्च व १६ मार्च अशे दोन दिवस सापळा लावला होता. मात्र दोन्ही वेळेस पटवारी यांनी नंतर बघू असे म्हणून पैसे स्विकारले नव्हते. त्यामुळे हे दोन्ही सापळे अयशस्वी ठरले. मात्र लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून बदनापूर पोलिस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक व्ही. बी. चिंचोले यांच्या फिर्यादीवरून बदनापूर ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पटवारी यांचे विरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोनि चिंचोले हे करीत आहेत. दरम्यान पोनि शंकर पटवारी हे गेल्या काही दिवसांपासून रजेवर गेलेले आहेत. (प्रतिनिधी)
पोलिस निरीक्षक शंकर पटवारी विरूद्ध गुन्हा
By admin | Updated: May 8, 2015 00:25 IST