उस्मानाबाद : गाणगापूरकडे दत्त दर्शनासाठी निघालेल्या तालुक्यातील कनगरा येथील नऊ जणांचा मंगळवारी अपघाती मृत्यू झाला होता. या नऊ जणांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास अंत्यविधी करण्यात आला. एकाच वेळी गावात चार सरण पेटल्याचे दुर्दैवी चित्र होते. नातेवाईकांसह ग्रामस्थांच्या आक्रोशामुळे अवघ्या कनगऱ्यावर शोककळा पसरली होती.उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथील भाविक मंगळवारी गुरूपोर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र गाणगापूरकडे निघाले होते. दुपारी सव्वाएक वाजेच्या सुमारास आळंद तालुक्यातील लाडचिंचोली गावानजीक डोगीबन नाल्याजवळ त्यांच्या जीपला झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. आळंद येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास या नऊ जणांचे मृतदेह कनगऱ्यात आणण्यात आले. त्यावेळी ग्रामस्थांसह नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. कोणाची आई, कोणाची बहीण तर कोणाची आजी या अपघाताने हिरावून घेतली होती. दुर्घटनेचे वृत्त कळल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांसह मयतांच्या नातेवाईकांनी कनगऱ्यामध्ये गर्दी केली होती. सकाळी आठच्या सुमारास अंत्यविधीस प्रारंभ झाला. इंगळे कुटुंबियातील कांताबाई, त्यांचा मुलगा संजय आणि नातू कृष्णा यांना एका चितेवर तर माऊली बळीराम इंगळे आणि गजाबाई श्रीमंत इंगळे यांना एका चितेवर अग्नी देण्यात आला. वर्षा प्रभाकर ढोबळे आणि स्वप्नील ढोबळे या मायलेकाचे अंत्यसंस्कार एका चितेवर करण्यात आले. याच वेळी सगजाबाई पंढरी आळंदे यांच्यासाठीही चौथे सरण रचण्यात आले होते. नातेवाईकांच्या आक्रोशामुळे कनगऱ्यातील वातावरण अत्यंत शोकाकूल झाले होते. यावेळी उस्मानाबादसह परिसरातील गावातूनही अंत्यविधीसाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
एकाच वेळी नऊ मृतदेहांवर अंत्यसंस्कार
By admin | Updated: July 21, 2016 01:09 IST