नांदेड : एके काळी नांदेड हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता़ हा किल्ला विरोधकांमुळे ढासळला नाही तर त्यासाठी घरभेदीच कारणीभूत आहेत़ शिवसेनेतील पदांचा बाजार आता थांबविण्यात येईल, असे स्पष्ट करत जिल्ह्यात यापुढे होणारी सेटिंग आणि चिटिंग बंद केली जाईल, असे शिवसेनेचे संपर्कप्रमुख खा़ विनायक राऊत यांनी सांगितले़जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदी निवड झाल्यानंतर खा़ राऊत यांच्या उपस्थितीत आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पूर्णा रस्त्यावरील पावडे मंगल कार्यालयात शिवसेनेचा जिल्हा मेळावा घेण्यात आला़ यावेळी ते बोलत होते़ खा़ राऊत म्हणाले, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला नांदेड जिल्हा आज सेटिंगमुळे बदनाम झाला आहे़ शिवसेनेची ही अवस्था विरोधकांमुळे झाली नाही तर पक्षातील घरभेदीच यासाठी कारणीभूत ठरले आहे़ दुर्दैवाने आज नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेत पदांचा बाजार भरला आहे़ हा बाजार ज्यांनी मांडला त्यांना आणि सहकार्य करणाऱ्यांना क्षमा मिळणार नाही़ जिल्हाप्रमुखांनी सांगितले तरी पदाधिकारी जाहीर करताना स्वत: खातरजमा केल्याशिवाय निवडी होणार नसल्याचेही खा़ राऊत यांनी स्पष्ट केले़ नांदेडच नाव ज्यांनी सेटिंगमुळे बदनाम केले त्यांना सुधारण्याची एक संधी दिली जाईल़ मात्र तरीही सुधारणा न झाल्यास मात्र कठोर निर्णय घेण्यात येईल़ आगामी विधानसभेत महायुतीच्या विजयासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले़माजी सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी खा़ राऊत यांची हिंगोली व नांदेड जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड झाल्यामुळे पक्ष नवी उभारी घेईल,असा विश्वास व्यक्त केला़ खा़ राऊत यापूर्वी संपर्कप्रमुख असताना प्रथम महापौर शिवसेनेचा झाल्याचेही त्यांनी सांगितले़ जिल्हाप्रमुख हेमंत पाटील, जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे, सुधाकर पांढरे, विरोधी पक्षनेते दीपक रावत, लातूरचे संपर्कप्रमुख धोंडू पाटील, माजी आमदार गजानन घुगे, सुभाष साबणे, जि़ प़ तील सेनेचे गटनेते नागोराव इंगोले, नगरसेवक बंडू खेडकर, डॉ़ मनोज भंडारी, भुजंग पाटील आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)
'बालेकिल्ला घरभेदींकडूनच ढासळला'
By admin | Updated: July 23, 2014 00:23 IST