विकास झाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी बुराडी येथील मैदानावर धरणे द्यावेत, असे दिल्ली पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सुचविले. दरम्यान, काही ठिकाणी सुरक्षा दलांशी झालेल्या वादामुळे शेतकऱ्यांनी सीमेवरच धरणे दिल्याने संपूर्ण रस्ते जाम झाले आहेत.
केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी हजारो शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. पंजाब, राजस्थान आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांचे लोंढेच्या लोंढे दिल्लीच्या सीमेवर आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमा बंदिस्त केल्या असल्याने शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. शेतकरी दिल्लीत पोहचू नयेत म्हणून काही ठिकाणी रस्तेही खोदण्यात आले आहेत. त्यामुळे दिल्लीतील सीमांना छावणीचे स्वरूप आले आहे. कृषी कायद्याला पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेशसह अन्य राज्यांतूनही विरोध होत आहे. महाराष्ट्रातूनही कायद्याला विरोध करण्यासाठी चारशेवर शेतकरी दिल्लीत पोहचले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकऱ्यांना सीमेवर रोखणे योग्य नसल्याचे सांगितले.
दरम्यान, किसान मोर्चा समन्वय समितीचे सदस्य योगेंद्र यादव यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनाला हिंसक वळण येत असल्याचे चित्र असल्याने सरतेशेवटी दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना बुराडी येथील निरंकारी समागम मैदानात धरणे देण्याची परवानगी दिली आहे. परंतु, शेतकऱ्यांनी तूर्तास त्यांची सूचना मान्य केली नाही.
टिकरी सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला आहे. दिल्ली पोलिसांनी केजरीवाल सरकारला ९ स्टेडियमला अस्थायी तुरुंगात परिवर्तन करण्याची परवानगी मागितली आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्लीतून एनसीआरसाठी जाणाऱ्या मेट्रोही प्रभावित झाल्या आहेत. दिल्ली मेट्रो रेल्वेने पोलिसांच्या आदेशानुसार शुक्रवारी दिल्लीहून नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद, गुरुग्राम, बहादूरगढ, वल्लभगढ या मार्गांवरील मेट्रो गाड्या रद्द केल्या पुढील आदेशापर्यंत हीच स्थिती राहणार आहे.
सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा न करता त्यांना अटक करणे हे योग्य नाही. शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीला उद्ध्वस्त करण्याचे सरकारचे धोरण दिसून येते, अशी टीका योगेंद्र यादव यांनी केली. केंद्र सरकारने या तीन कायद्यांना परत घ्यावे. सरकारला हा कायदा जर करायचाच असेल तर त्यात किमान हमीभावाचा समावेश करावा, असेही ते म्हणाले.
सर्वत्र सुरक्षा यंत्रणा तैनात
या आंदोलनाला केव्हाही आक्रमक स्वरूप येऊ शकते याची जाणीव असल्याने दिल्ली पोलिसांनी कापसहेडा सिंघू, टिकरी, ढासा, फरिदाबाद, गुरुग्राम आदी ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा तैनात केली आहे. शुक्रवारी रात्री फरिदाबाद, गुरुग्राम आणि सोनीपत येथील रस्ते जाम झाले होते.
------