लातूर : लातूर राखीव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, एकूण १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे़ जवळपास २५ ते २६ राऊंडमध्ये ही मतमोजणी पूर्ण होणार असून, सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे़ सुपरवायझर, असिस्टंट, मायक्रो आॅब्झर्व्हर यांच्या टेबलनिहाय नियुक्त्या केल्या आहेत़ बार्शी रोडवरील शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या संकुलात १६ मे रोजी उमेदवारांच्या समक्ष मतदान यंत्र सीलबंद रूममधून बाहेर काढल्यानंतर सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे़ या मतमोजणीसाठी एकूण १४ टेबलचे नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक टेबलवर सुपरवायझर, असिस्टंट आणि मायक्रोआॅब्झरवरच्या निरिक्षणाखाली मतमोजणी होणार आहे़ जिल्हानिवडणूक निर्णय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, राऊंड आॅफिसर यांचे निरिक्षणही राहणार आहे़ बाहेरच्या बाजूने उमेदवार प्रतिनिधींसाठी सोय करण्यात आली असून, प्रत्येक टेबलवरील मतमोजणीकडे बारकाईने लक्ष राहणार आहे़ मतमोजणी प्रत्येक यंत्रावर झालेले मतदान बटण दाबून तेथे उपस्थित उमेदवारांच्या प्रतिनिधींना दाखविण्यात येणार आहे़ त्यांनी हा मतांचा आकडा लिहून घेतल्यानंतर मतमोजणी अधिकारी त्याची नोंद स्वत:कडे करून घेतील़ प्रत्येक मतदान यंत्रावर झालेल्या मताची नोंद केलेली सत्यप्रत उपस्थित सर्व उमेदवार प्रतिनिधींना देण्यात येणार आहे़ प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी १४ टेबल लावण्यात येणार असून, त्यातून सूक्ष्म पद्धतीने मतमोजणी करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ़ शर्मा यांनी दिली़ (प्रतिनिधी) ६०० पोलिसांचा तगडा बंदोबस्त़़़ शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या परिसरात व मतमोजणी कक्षाबाहेर तगडा बंदोबस्त लावण्यात येणार असून, गस्त पथके, गुन्हे शाखा, विशेष शाखेतील अधिकारी, कर्मचारी, कमांडो पथक, स्ट्रॅकिंग फोर्स, वाहतूक शाखेचे कर्मचारी, बंदोबस्तासाठी तैनात असतील़ मतदान कक्ष व स्ट्राँगरूम परिसरात यापुर्वीच ब्लॅक कमांडो बंदोबस्तावर आहेत़ मतमोजणी होईपर्यंत या कमांडोची गस्त तेथे राहणार आहे़ शिवाय, मतमोजणीच्या दिवशी शहरातही बंदोबस्त राहणार आहे़ एक अप्पर पोलिस अधीक्षक, चार उपविभागीय पोलिस अधिकारी, ९ पोलिस निरीक्षक, १५ सहाय्यक पोलिस निरीक्षक, ४९ पोलिस उपनिरिक्षक, ५८० पोलिस कर्मचारी, ४२ महिला पोलिस कर्मचारी, राज्य राखीव दलाची एक कंपनी तैनात असेल़ शिवाय राखीव पोलिस फोर्स ठेवण्यात आला असून, उत्साही कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांची उपस्थिती लक्षात घेता बंदोबस्त तगडा ठेवण्यात येणार आहे़ मतमोजणी परिसर आणि मतमोजणी परिसराबाहेर पोलिसांची करडीनजर राहणार आहे़
मतमोजणीचे होणार २५ राऊंड
By admin | Updated: May 14, 2014 01:06 IST