औरंगाबाद : दुचाकीस्वार कापूस व्यापाऱ्याला लाथ मारून खाली पाडल्यानंतर त्यांना बेदम मारहाण करून त्यांची ५ लाखांची रोकड हिसकावून नेणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. आरोपीकडून रोख रकमेसह लुटमार करण्यासाठी वापरलेली दुचाकी आणि मोबाईल असा सुमारे ४ लाख ६ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त केला.
विशाल साईनाथ काकडे, योगेश निवृत्ती कोलते (दोघे रा. कोलते टाकळी), आकाश ऊर्फ लाल्या राजेंद्र बोरसे (२४, रा. वारेगाव), अमोल ऊर्फ डोळा संतोष जाधव, सचिन रमेश बनकर, प्रदीप गजानन तायडे (रा. वाढोणा, ता. भोकरदन, जिल्हा जालना) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार तक्रारदार कांताराम ओमकार पवार (रा. डोणवाडा) हे आणि साहेबराव सोमदे दोघे कापूस खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. २ डिसेंबर रोजी सायंकाळी त्यांनी सिल्लोड येथील पुनीत कॉटन इंडस्ट्रीज येथून ४ लाख एक हजार रुपये रोख घेतले. शिवाय त्यांच्याजवळ २२ हजार ५०० रुपये होते. ही रक्कम एका बॅगेत ठेवून ते मोटारसायकलने वडोदबाजार, जातेगाव मार्गे डोणगाव येथे जात होते. वाघलगाव फाटा येथे दोन दुचाकीवरून आलेल्यांपैकी एकाने त्यांच्या मोटारसायकलला लाथ मारली आणि खाली पाडले. यावेळी आणि आरोपींनी त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्याजवळील पाच लाखांची बॅग हिसकावून नेली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत शिंदे, उपनिरीक्षक गणेश राऊत, सहायक फौजदार सय्यद जिया, हवालदार संजय देवरे, राजेश जोशी, बाळू पाथरीकर, नामदेव शिरसाट, विक्रम देशमुख, संजय भोसले, वाल्मीक निकम, योगेश तरमाळे आदींनी झटपट तपास करून घटनेनंतर अवघ्या १२ तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. लुटलेल्या रकमेपैकी २ लाख ९६ हजार ३०० रुपये पोलिसांनी जप्त केले. सोबत गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल, ६ मोबाईल जप्त केले.
टीप देणारा आरोपी पसार
टाकळी कोलते येथील तीन आरोपींनी लुटमारीचा कट रचला. यापैकी एकाने व्यापाऱ्यावर पाळत ठेवून माहिती दिली. तो आरोपी पसार असून मोठी रक्कम त्याच्याकडे असल्याचे पोलीस निरीक्षक फुंदे यांनी सांगितले.
कट्ट्यावर गप्पा मारता मारता रचला लुटीचा कट
आरोपी विशाल काकडे याने अन्य दोन मित्रांसोबत गावातील कट्ट्यावर गप्पा मारता मारता कापूस व्यापाऱ्यांना लुटण्याचा कट रचला. यानंतर वारेगावातील मित्रांना लुटीसाठी बोलावून घेतल्याचे समोर आले.