औरंगाबाद : मराठवाडा दुष्काळात पोळून निघत असताना औरंगाबाद महापालिकेचे नगरसेवक लवकरच दुबईचा दौरा करणार आहेत. दुबईचा झालेला विकास, तेथील व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी दौरा आयोजित करण्यात येत आहे. मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौर त्र्यंबक तुपे यांनी दुबई दौऱ्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मनपाची आर्थिक स्थिती खराब असल्यामुळे दुबई दौरा नगरसेवकांनी स्वखचार्तून करावा, अशा सूचना महापौरांनी यावेळी केल्या.उपमहापौर प्रमोद राठोड यांनी सर्वसाधारण सभेत दुबई दौऱ्याचा प्रस्ताव ठेवला होता. दुबई शहराचा विकास, तेथील नागरी सुविधांचे व्यवस्थापन उल्लेखनीय आहे. विकसित दुबईचा नगरसेवकांनी अभ्यास दौरा केल्यास त्याचा शहराला फायदा होईल, त्यामुळे दौऱ्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी राठोड यांनी केली. मनपाची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे स्वखर्चातून हा दौरा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यास महापौर त्र्यंबक तुपे यांनी मंजुरी दिली. नगरसेवक स्वखर्चाने जाणार असले तरी दौऱ्याचे नियोजन महानगरपालिकेमार्फत केले जाणार आहे. या दौऱ्यात मनपाच्या काही अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे.
दुष्काळात नगरसेवकांचा दुबईचा दौरा
By admin | Updated: May 11, 2016 01:02 IST