औरंगाबाद : छावणी परिषदेतील नगरसेवक तथा छावणी गणेश महासंघाचा विद्यमान अध्यक्ष संजय गारोल याने पथकर नाका ठेकेदाराकडून मेहुण्यामार्फत एक लाखाची लाच रविवारी घेतली. तेव्हापासून तो फरार झालेला आहे. लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडण्यात आलेल्या त्याच्या मेहुण्याला न्यायालयाने १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.अजय नायडू असे पोलीस कोठडी ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक प्रकाश कुलकर्र्णी यांनी सांगितले की, तक्र ारदार हे छावणी परिषदेच्या पथकर नाक्याचे कंत्राटदार आहेत. त्यांच्या ठेक्याचा कालावधी ३० सप्टेंबर रोजी समाप्त होत आहे. त्यांनी यापुढेही आपल्यालाच ठेका मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. नगरसेवक गारोल याने त्यांना एक लाख रुपये लाच मागितली. ही रक्कम त्याने त्याचा मेहुणा अजय नायडू याच्याकडे देण्यास सांगितले. ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिसांनी छावणीतील नायडूच्या कापड दुकानात सापळा रचला असता एक लाख रुपये घेताना नायडूला रंगेहाथ पकडण्यात आले. ही खबर गारोलपर्यंत गेली आणि तो पसार झाला. दरम्यान, नायडूला न्यायालयात हजर करण्यात आले. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एल. पठाण यांनी नायडूला १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. सरकारी वकील बी. के. पवार यांनी पोलिसांची बाजू मांडली.
लाचप्रकरणी नगरसेवक संजय गारोल सापडेना
By admin | Updated: September 15, 2015 00:35 IST