गल्ले बोरगांव : कधी एकदाची शाळा संपते, परीक्षा होताच उन्हाळ्याची सुट्टी लागते अन् मामाच्या गावाला जातो. अशी बैचेन करणारी परिस्थिती मुलांमध्ये असते. मात्र, दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळाही बंद अन मामाच्या गावाकडे जावे तर तिथेही कोरोनाने वेढा घातल्याने बच्चे कंपनीचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे यंदाही उन्हाळ्याची सुट्टी चार भिंतीतच घालावी लागणार आहे.
आंबे खाण्याची मौज, आमराईतील डाबडुबलीचे खेळ, झाडावर झोके, नदीवर पोहायला जाण्याची ओढ आता कोरोनाने हिरावून घेतली आहे. मोबाईलच्या अतिवापराने मामाचे पत्र हिरावून घेतले. अशातच आता कोरोनामुळे मुलांचे मामाचे गाव दोन वर्षांपासून सुटल्याची खंत चिमुकल्यांना बोचत आहे. उन्हाळ्याची सुट्टी मामाच्या गावी घालविण्याच्या आनंदावर विरजण पडले. कोरोनाच्या संक्रमणाचा धोका लक्षात घेता लग्न, अंत्यसंस्कार करण्यासाठी शासनाने माणसांची उपस्थिती मर्यादित केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या दोन्ही लाटेत मुलांची घरच शाळा झाली आहे.
शाळा बंद, मोबाईलचा वाढला वापर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने मुले घरीच आहेत. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे मुलांमध्ये मोबाईलचा वापर वाढला असून, मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला आहे. सद्य स्थितीत मोबाईल हे जीवनावश्यक साधन झाल्याचे चित्र आहे. त्यातच सोशल मीडियावरच मामाची भेट घेतली जात आहे. नातेसंबंधाची भेट दुरावली असली तरी सोशल मीडियावरच मामाच्या गावाची हौस भागवावी लागत असल्याचे दिसून येत आहे.