औरंगाबाद: जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ऑक्टोबर २०२० महिन्यात झालेल्या बैठकीत ३५२० खाटा कोविड रुग्णासांठी राखीव ठेवण्याचे आदेश खासगी हॉस्पिटल्सने फाट्यावर मारले. कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व खासगी दवाखान्यांनी वाढीव खाटा येत्या तीन दिवसांत उपलब्ध केल्या आहेत, की नाही याची प्रत्यक्ष तपासणी करण्यात यावी. वाढीव खाटा उपलब्ध न केल्यास संबंधित रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी रविवारी दिला.
खासगी रुग्णालयात फक्त १५४६ खाटांवर सध्या कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. काही महिन्यांपूर्वी कोविडचा प्रभाव कमी झाल्याने उर्वरित १९७४ खाटांवर नॉन कोविड रुग्ण उपचार घेत असल्याचे आढळले आहे. उर्वरित खाटा संबंधित खासगी रुग्णालयांनी लवकर कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचे आदेशही विभागीय आयुक्तांनी रविवारी दिले. कृष्णा हॉस्पिटलने ५० चे उद्दिष्ट असताना ६१ खाटा वाढविल्या, लाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने २९ उद्दिष्ट असतांना ४२ खाटा तर एशियन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने ८० ऐवजी १३०, युनायटेड सिग्मा हॉस्पिटलने १०० ऐवजी १३० खाटा वाढविल्या. ममता हॉस्पिटललादेखील तांत्रिक सहाय्य पुरविणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. एमजीएम हॉस्पिटलला २०० तर घाटीला ५०८ खाटा वाढविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात खासगी व शासकीय रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्याच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि.प.सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, उपायुक्त जगदीश मणियार, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, डॉ. नीता पाडळकर, खासगी रुग्णालयाचे प्रमुख उपस्थित होते.
या हॉस्पिटल्सना साथरोग अधिनियमान्वये नोटीसऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या बैठकीत अनेक रुग्णालयांना खाटा वाढविण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये धुत हॉस्पिटलला १५० खाटा वाढविण्याचे निर्देश दिलेले असताना केवळ ८७ खाटा वाढविल्या, हेडगेवार हॉस्पिटलला २०० खाटा वाढविण्याचे निर्देश दिलेले असताना केवळ ७२ खाटा वाढविल्या तर बजाज हॉस्पिटलला १५० खाटा वाढविण्याचे निर्देश दिलेले असताना केवळ ५० खाटा वाढविल्या. एमआयटी, जे.जे.प्लस, सावंगीकर आणि माणिक हॉस्पिटलनेदेखील निर्देशित केल्याप्रमाणे खाटा न वाढविल्याने या रुग्णालयांना साथरोग अधिनियम अन्वये नोटीस देऊन उर्वरित खाटा येत्या तीन दिवसात वाढविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.