औरंगाबाद : महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने औरंगाबादेतील ‘सीआयआय’, ‘सीएमआयए’, ‘एमएएसआयए’, औरंगाबाद फर्स्ट, एजेव्हीएम या उद्योग आणि व्यापार संघटनांनी राबविलेल्या कोविड विनियोग वर्तन (सीएबी) आणि कोविड प्रतिबंधक लसीकरण जागृती अभियानाची सांगता १६ जुलै रोजी झाली. हे अभियान (रॅली) १२ जुलै रोजी सुरू झाले होते.
दरम्यान, ८० ते ९० टक्के लसीकरण पूर्ण केलेल्या कंपनी आणि आस्थापनांमध्ये जाऊन या पाच दिवसांच्या अभियानामध्ये त्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
या समारोप कार्यक्रमप्रसंगी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, औरंगाबादेतील उद्योग संघटनांनी कोविडविरुद्धच्या लढाईत उल्लेखनीय मदत केली. ‘सीएसआर’ फंडातून वैद्यकीय उपकरणे दिली. आता या जागृती अभियानाच्या माध्यमातून निश्चितच नागरिकांमध्ये लसीकरण आणि कोविड विनियोग वर्तन (सीएबी) याबाबत जागरूकता निर्माण होईल. सर्व उद्योग संघटनांनी एकत्र येऊन शासनासोबत काम करून या महामारीच्या कठीण परिस्थितीत चांगले योगदान दिले आहे. हे मॉडेल राज्यातील इतरांना काम करण्यासाठी नक्कीच प्रेरणा देईल.
मनपाच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या की, या कठीण काळात उद्योगांनी आम्हाला सतत पाठिंबा दिला आणि अनेक उपयुक्त वैद्यकीय उपकरणांच्या माध्यमातून मदत केली. ज्यामुळे अनेक रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी मोठी मदत झाली. या रॅलीदरम्यान ‘आशा वर्कर्स’ना प्रोत्साहन मिळाले.
यावेळी ‘सीआयआय’चे अध्यक्ष रमण अजगावकर, उपाध्यक्ष प्रसाद कोकीळ, ‘सीआयआय महाराष्ट्रचे उपाध्यक्ष श्रीराम नारायणन, सी. पी. त्रिपाठी, किरण जगताप, अनिल पाटील, गजानन देशमुख, प्रीतीश चटर्जी, सरदार हरी सिंग आणि गुलाम हक्कानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.