तुळजापूर : यात्रा अनुदानातील १ कोटी ६२ लाख रूपयांचा अपहार केल्याप्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या एका ठेकेदाराला बुधवारी तुळजापूर पोलिसांनी अटक केली होती़ अटकेतील ठेकेदाराला न्यायालयात हजर केले असता त्याला ११ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ दरम्यान, अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर शुकवारी सुनावणी होणार आहे़ तर या प्रकरणातील इतर आरोपित अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत़तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील नगर पालिकेला सन २०११- १२ मध्ये आलेल्या यात्रा अनुदानात अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन नगराध्यक्षा अर्चना विनोद गंगणे, संबंधित नगरसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी संतोष टेंगळे, तत्कालीन लेखापाल अविनाश राऊत, ठेकेदारांविरूध्द गुन्हा दाखल झाला होता़ आरोपितांना अटक करण्यासाठी नेमण्यात आलेल्या विविध पथकांना एकही आरोपित सापडला नव्हता़ तर गुन्हा दाखल झाल्याच्या आठ दिवसानंतर केवळ एक ठेकेदार शशिकांत ईश्वर जाधव (रा़तुळजापूर) हा बुधवारी तुळजापूर पोलिसांच्या हाती लागला होता़ तर या प्रकरणातील इतर आरोपित अद्यापही फरारच आहेत़ पोलिसांनी कागदपत्रांच्या आधारे तपास सुरू करून काही जणांचे जबाब नोंदविले आहेत़ अटकेतील ठेकेदार शशिकांत जाधव याना गुरूवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना ११ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ दरम्यान, या प्रकरणातील काही आरोपितांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत़ या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार असून, या सुनावणीकडे तुळजापूर शहरासह जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे़ (वार्ताहर)
ठेकेदारास कोठडी
By admin | Updated: April 6, 2017 23:33 IST