औरंगाबाद : संविधान हा शोषित, वंचितांचा प्राणवायू असून त्याची आजही प्रामाणिकपणे अंमलबजावणी झालेली नाही. संविधानाच्या अंमलबजावणीसाठी आता संघर्ष पुकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कवयित्री डॉ. प्रतिभा अहिरे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतीय संविधान दिनानिमित्त कवयित्री डॉ. अहिरे यांचे ‘संविधानापुढील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधि विभागप्रमुख डॉ. साधना पांडे या होत्या. व्यासपीठावर विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालक डॉ. चेतना सोनकांबळे, विद्यार्थी संसद सचिव नामदेव कचरे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. प्रतिभा अहिरे म्हणाल्या, शोषित, वंचित, श्रमिकांना माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळण्याची हमी संविधानाच्या माध्यमातून मिळाली आहे; पण आजपर्यंत या देशात संविधानाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी, सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात समता, न्याय प्रस्थापित होऊ शकला नाही. तरीदेखील संविधानाचे मूल्यांकन करण्याचे षड्यंत्र रचले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत खडतर परिश्रमातून संविधानाची निर्मिती केली. शिक्षण, शेती व देशाच्या साधन संपत्तीचे राष्ट्रीयीकरण करण्याचे स्वप्न बाबासाहेबांनी संविधानाच्या रूपातून पाहिले होते. मात्र, या देशातील भांडवलदारांनी लोकशाहीच्या शिडी वापरून संविधान गुंडाळून ठेवले, असेही त्या म्हणाल्या.अध्यक्षीय समारोपात डॉ. पांडे म्हणाल्या की, संविधानाची उद्देशिका ही आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली पाहिजे. बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्त्रियांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची आपली जबाबदारी आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालक डॉ. चेतना सोनकांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संजय शिंदे यांनी मानले.
संविधान हा शोषित, वंचितांचा प्राणवायू
By admin | Updated: December 1, 2014 01:25 IST