औरंगाबाद : महापालिकेचा नगरसचिव विभाग आणि महापौर कला ओझा यांनी ११ आॅगस्ट रोजी झालेल्या सभेमध्ये एक, दोन नव्हे तर सर्व नगरसेवकांची दिशाभूल केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. कार्यकारी अभियंतापदी पी. आर. बनसोड, अफसर सिद्दीकी यांना पदोन्नती दिल्याचा प्रस्ताव २३ जुलैपासून नगरसचिव विभागाकडे पडून होता. ११ आॅगस्टच्या सभेत तो ठराव ऐनवेळी का आणला, यावरून विरोधकांनी रान पेटविले असून, महापौर कला ओझा आणि नगरसचिव प्रमोद खोब्रागडे यांच्यावर कारवाईची मागणी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली. एकाच प्रस्तावाचे दोन कारणापुरते उतारे तयार करण्यात आले. एक उतारा नगरसेवकांना देण्यासाठी, तर दुसरा पदोन्नती देण्यात आलेल्या अभियंत्यांना शासनाकडे पाठविण्यासाठी तयार केला. दोन्ही प्रस्तावांच्या ठरावावर महापौर आणि नगरसचिवाच्या सह्या आहेत. अभियंत्यांच्या नावानिशी असलेला ठराव शासनाकडे पाठविण्यात आला असून, विरोधकांची तोंडं बंद करण्यासाठी नावे नसलेला ठराव देऊन महापौरांनी सारवासारव केल्याचे दिसते. दोन अभियंत्यांना पदोन्नती देण्याची गरज प्रशासनाने प्रस्तावात विषद केली होती. ५७७ कोटी रुपयांच्या दोन योजना शहरात सुरू होणार आहेत, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कार्यकारी अभियंते हवेत असे प्रशासनाने प्रस्तावात म्हटले होते.
मनपात पदोन्नतीचे षड्यंत्र
By admin | Updated: September 12, 2014 00:31 IST