औरंगाबाद : शिवसेनेला भाजपाने हात दिल्यानंतर संकटाच्या काळात ज्यांनी दगा देऊन भाजपासोबतच घरोबा केला. त्या गद्दारांचा निकाल विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर लावण्याचा चंग आज बांधण्यात आला. समर्थनगर येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयात श्रमपरिहारानिमित्त पक्षाची बैठक झाली. पक्ष सोडून जाण्याची हिंमत करण्याची ताकद अनेकांमध्ये येणे म्हणजे शिवसेनेचा धाक, दबदबा कमी होत चालल्याचे लक्षण असल्याचे यावेळी नेते म्हणाले. निवडणुकीतील हालहवालानंतर शिवसेना उपनेते खा. चंद्रकात खैरे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची चिंतन बैठक घेण्यात आली. खा. खैरे यांनी पक्ष सोडून गेलेल्यांचा खरपूस समाचार घेतला. शिवसेना मोठ्या ताकदीने विधानसभेत यश मिळविणार जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया, नगरसेविका प्रीती तोतला, जगदीश सिद्ध, हुशारसिंग चौहान, सविता सुरे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. या सर्वांनी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केले आहे.त्यांची तक्रार विभागीय आयुक्तांकडे करण्यात येईल. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे बैठकीत म्हणाले की, या गद्दारांची तक्रार १९ तारखेनंतर विभागीय आयुक्तांकडे करण्यात येईल.सुरेंद्र कुलकर्णी यांनी दोन्ही महापौर निवडणुकीत पक्षाकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप खा. खैरे यांनी केला. गुलमंडीतील ‘खुळखुळ्या’ने पक्षाच्या नावाचा वापर करून जमिनी बळकाविण्याचा धंदा केल्याचा आरोपही त्यांनी केला.
निकालानंतर गद्दारांचा निकाल
By admin | Updated: October 17, 2014 23:57 IST