लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महानगरपालिकेतील पाच स्वीकृत सदस्यांपैकी तीन जागा काँग्रेसच्या वाट्याला येणार असून राष्ट्रवादी व भाजपाला प्रत्येकी एक स्वीकृत सदस्यपद मिळणार आहे. शुक्रवारच्या सोडतीमध्ये शिवसेनेच्या हाती मात्र काहीच आले नाही. परभणी महानगरपालिकेत पाच स्वीकृत सदस्यांची १५ जून रोजी निवड घोषित करण्यात येणार आहे. यासाठी सोमवारी सकाळी १० ते १२ दरम्यान अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मनपात सदस्यांच्या तुलनेत पाच जणांची स्वीकृत सदस्यपदी निवड केली जाणार आहे. १३ नगरसेवकांमागे एका स्वीकृत सदस्याची निवड होणार आहे. काँग्रेसचे सभागृहात ३१ सदस्य आहेत. एक अपक्षही काँग्रेससोबत आहे. त्यामुळे काँग्रेसचे दोन सदस्य सहज निवडून येतील. राष्ट्रवादीचे १८ सदस्य असून या पक्षाचा एक सदस्य निवडला जाणार आहे. तर भाजपाचे ८ सदस्य असले तरी तिसऱ्या क्रमांकाची मते लक्षात घेता या पक्षाचाही एक स्वीकृत सदस्य निवडला जाणार आहे. पाचव्या जागेसाठी मात्र सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी मनपात सकाळी ११ वाजेच्या सुमारास आयुक्त राहुल रेखावार यांच्या कक्षात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपाच्या गटनेत्यांच्या उपस्थितीत चिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली. त्यामध्ये काँग्रेस व शिवसेना या दोन पक्षाच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्यामध्ये काँग्रेस पक्ष नशिबवान ठरला व या पक्षाच्या नावाने चिठ्ठी निघाली. त्यामुळे तिसरी जागाही काँग्रेसकडेच गेली.
काँग्रेस पक्षाचे तीन स्वीकृत सदस्य होणार
By admin | Updated: June 9, 2017 23:54 IST