हिंगोली : देशभरात काँग्रेसविरोधी लाट असताना नरेंद्र मोदींच्या आशादायी प्रचारामुळे भाजपाला सोन्याचे दिवस आले आहेत. परिणामी राज्यातील काँग्रेसची दयनीय अवस्था झाल्याने दिग्गजांना पराभव स्वीकारावा लागला. अशा स्थितीतदेखील हिंगोलीची जागा आ. राजीव सातव यांनी खेचून आणल्याने विकासकामांना जनतेने संधी दिल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील राजकीय मंडळींनी देखील आ. सातव यांनी केलेल्या विकास कामांमुळे विजय मिळविल्याचा दुजोरा प्रतिक्रियेतून दिला आहे. वावटळीत जागा जिंकली भाऊराव पाटील गोरेगावकर नरेंद्र मोदींच्या वावटळीत काँग्रेसने हिंगोलीची जागा राखल्याचे पूर्णत: श्रेय मतदारांना जाते. कारण राज्यात दयनीय स्थिती झाली असताना हिंगोलीत मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखविला. मतदारांनी भाजपच्या आश्वासनांना बळी न पडता मतदारांनी आम्हाला वाचविले. मतदारांनी आम्हाला दिलेल्या संधीबद्दल लोकांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाहीत. विजय खेचून आणला-जयप्रकाश दांडेगावकर एवढ्या मोठ्या वादळात हिंगोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसने विजय खेचून आणला आहे. हिंगोली मतदारसंघातील मतदारांनी धर्मनिरपेक्ष विचारांना व विकासाला साथ दिल्यामुळेच आघाडीचे उमेदवार आ. राजीव सातव यांचा विजय झाला. काँग्रेस व राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा विजय झाल्याची प्रतिक्रिया वसमतचे आ.जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली. विकासकामांचा विजय-मिलिंद यंबल विकासाच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी मनापासून मेहनत घेतली होती. शिवाय खुद्द लोकसंपर्क ठेवून आ.राजीव सातव यांनी मोठी विकासकामे केलेली आहेत; परंतु देशभरात असलेल्या नरेंद्र मोदींच्या लाटेत मिळालेले हे यश उल्लेखनीय ठरते. प्रामुख्याने कळमनुरी मतदारसंघात केलेल्या विकासकांमामुळे तेथून आघाडी घेतल्याने मिळालेला हा विजय विकासाचा आहे. ताट हिसकावल्यामुळे सेनेचा प्रचार केला-शिवाजी माने आमचे ताट हिसकावून घेतल्यामुळे मी शिवसेनेचा प्रचार केल्याची जबाबदारी स्वीकारतो. लोकसभेच्या निवडणुकीत लोकांनी दिलेला हा निर्णय असून शेवटी जनताच लोकशाहीत सर्वश्रेष्ठ असते. आमच्या बाजूने वातावरण असताना नेतेमंडळी एकीकडे आणि मतदार दुसरीकडे असूनही जनतेने आम्हाला भरभरून मते दिली; परंतु धनशक्तीचा प्रयोग झाल्याने काँग्रेसचा विजय झाला. पूर्वीप्रमाणे मी आजही राष्ट्रवादीचा असून पक्षात ठेवायचे की नाही, हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. महायुतीच्या उमेदवाराचा निसटता पराभव-जयप्रकाश मुंदडा हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजपा महायुतीच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला. त्याबद्दल अत्यंत दु:ख आहे. एकीकडे मोदी सरकार आल्याचा आनंद आहे. तर दुसरीकडे हिंगोलीची जागा गेल्याचे दु:ख आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात जर मतदानाची टक्केवारी थोडी वाढली असती तर हिंगोलीमध्येही विजय मिळाला असता, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी सहकारमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी दिली.
विकासकामांमुळेच काँग्रेसला मिळाले यश
By admin | Updated: May 17, 2014 00:58 IST