जालना : केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाच्या विरोधात जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध तालुक्यांत तहसील कार्यालयांवर मोर्चे काढून विरोध करण्यात आला.जालना शहरात नूतन वसाहत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरूवात करण्यात आली. अंबड चौफुलीमार्गे हा मोर्चा नोटाबंदीच्या विरोधात घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर शिष्टमंडळाने निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. ५० दिवसांत सर्व व्यवहार सुरळीत होतील, असे आश्वासन दिले. मात्र, परिस्थिती अधिक अवघड होऊन बसली आहे. त्याचा फटका शेतकरी, सर्वसामान्य जनतेला बसत आहे. या निर्णयामुळे सहकारी बँकांसह राष्ट्रीयकृत बँकाही अडचणीत सापडल्या आहेत. नोटाबंदीच्या आडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भांडवलदारांकडून काळा पैसा घेऊन प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. नोटाबंदीमुळे देशभरात आर्र्थिक अराजकता निर्माण झालेली असून सर्व प्रकारामुळे झालेल्या नुकसानीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी मराठवाडा विभाग समन्वयक अरविंदसिंग चौहान, माजी आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आ. तथा जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, आर. आर. खडके, प्रदेश सचिव विजय कामड, शहराध्यक्ष अब्दुल हाफिज, कल्याण दळे, महिला जिल्हाध्यक्षा शीतल तनपुरे, जालना नगर पालिकेतील गटनेता गणेश राऊत, राजेंद्र राख, शेख महेमूद, नवाब डांगे, ज्ञानेश्वर पायगव्हाणे, संजय देठे, राजेंद्र वाघमारे, सभापती महावीर ढक्का, जगदीश भरतीया, विजय चौधरी, शिक्षाबाई ढक्का, वाजेद खान, राहुल हिवाळे, अरूण मगरे, किशोर गरदास, आशिष सामलेट, शेख खलील, राजस्वामी जीवन सले, अमजद खान, चंदाबाई भांगडिया, वैभव उगले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
नोटाबंदी विरोधात जिल्ह्यात काँग्रेसचा मोर्चा
By admin | Updated: January 6, 2017 23:53 IST