औरंगाबाद : ‘मांगीरबाबा की जय’ असा जयघोष करीत हजारो भाविक शेंद्र्यातील मांगीरबाबांच्या चरणी नतमस्तक होत होते. मात्र, यात्रेच्या पहिल्या दिवशी भक्तांची संख्या रोडावलेली दिसली. यात्रेवर दुष्काळाचा परिणाम झाल्याचे देवस्थानाच्या वतीने सांगण्यात येत होते. मांगीरबाबांची यात्रा शेंद्रा गावात मंगळवारी सुरू झाली. तत्पूर्वी सोमवारी मध्यरात्री १२ वाजता महापौर त्र्यंबक तुपे यांच्या हस्ते मांगीरबाबांची आरती झाली. यावेळी भाजपचे उपाध्यक्ष प्रदीप पाटील यांची उपस्थिती होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक रात्रीच शेंद्र्यात मुक्कामी येऊ लागले होते. पहाटेपासूनच नवस केलेले भाविक अनवाणी मांगीरबाबाच्या दर्शनाला जाताना दिसून आले. नवस केलेल्या महिलांनी पुरुषांच्या डोक्यावर चारही बाजंूनी कापड धरले होते. डफ वाजवीत भाविक पायी दर्शनाला जात होते. अशा पद्धतीने मिरवणूक काढून दिवसभर हजारो भाविक मांगीरबाबांच्या दर्शनाला येत होते. गावाच्या चोहोबाजूने दिवसभर डफांचा आवाज घुमत होता. मांगीरबाबांच्या मंदिर परिसरात मोठा मंडप टाकण्यात आला आहे. यामुळे भाविकांना कडक उन्हात सावलीचा आधार होता. मांगीरबाबांच्या मूर्तीसमोर लोखंडी जाळी बसविण्यात आली असून, मांगीरबाबांच्या मूर्तीसमोर भाविक नतमस्तक होत होते. कडेवरील बाळांना देवाचे दर्शन घ्यायला लावत होते. देवाचे दर्शन झाल्यावर ‘मांगीरबाबा की जय’ असा जयघोष करीत भाविक आनंदोत्सव साजरा करीत साखर, रेवड्या उधळत होते. खाली पडलेल्या रेवड्या घेण्यासाठी भाविकांची लगबग सुरू होती. या रेवड्या प्रसाद म्हणून जपून ठेवत सहपरिवाराला खायला दिल्या जात होत्या. देवस्थानाच्या पाठीमागील बाजूस मांगीरबाबाची गढी आहे. गढीवर चढून जात भाविक गढीचे दर्शन घेऊन येथील येथील माती मस्तकाला लावत होते. यात्रेतील सर्व वातावरण मांगीरबाबामय झाले होते. मंदिराच्या मंडपात भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. पाण्याचे पाऊच दिले जात होते. गळ टोचून घेण्याची प्रथा अजूनही येथे कायम होती. दिवसभरात शेकडो लोकांनी गळ टोचून घेतले होते. हनुमानाच्या मंदिरापासून गळ टोचून भाविक मांगीरबाबाच्या मंदिरापर्यंत जात होते. लहुजी साळवे विकास परिषदेच्या वतीने जनजागृती केली जात आहे. तरी पण आज भाविक गळ टोचून घेताना दिसून आले. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गळ टोचणाऱ्यांची संख्या घटली आहे, हे विशेष. मंदिराच्या बाजूलाच देवस्थान समितीचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. येथे बसून अध्यक्ष भास्करराव कचकुरे, सुरेश नाईकवाडे, वैजिनाथ मुळे, साळुबा कचकुरे, कडुबा कुटे, किशोर शेजूळ आदी भाविकांना मार्गदर्शन करीत होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर शेंद्रा येथे देवस्थान परिसरात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याद्वारे यात्रेवर नजर ठेवली जात आहे. सरपंच शुभांगी तांबे, उपसरपंच पांडुरंग कचकुरे, सदस्य- रमेश जाधव, रेखा तांबे, नुरजहाँ पठाण, शिवगंगा कचकुरे, किरणबाई कचकुरे, रेखा नवगिरे, भास्करराव कचकुरे, रवींद्र तांबे, पोलीस पाटील अफसर पठाण आदी परिश्रम घेत आहेत. यात्रा भरली, पण...शेंद्रा गावात शिरताच नजरेस मोठी यात्रा भरलेली दिसून येते. लहान-मोठी खेळणी, खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल, रहाटपाळणे, विविध खेळणी उभारण्यात आली आहे. मात्र, यात्रेत दरवर्षीप्रमाणे गर्दी दिसून आली नाही. उन्हाचा पारा चढल्याने दुपारी गर्दी ओसरली होती. सायंकाळी गर्दीने परिसर फुलला, पण दुष्काळाचा परिणाम यात्रेवर स्पष्टपणे जाणवत होता. येथे रेवड्याचे शेकडो स्टॉल लागले आहेत. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदा रेवड्याची उधळण कमी झाली. याविषयी रेवडी विक्रेता अशोक तमखाने यांनी सांगितले की, दरवर्षी यात्रेच्या पहिल्याच दिवशी माझ्याकडील ७० ते ८० किलो रेवड्या विक्री होत असत. आज सायंकाळपर्यंत ३४ किलोच रेवड्या विक्री झाल्या. यावरून दुष्काळाचा यात्रेला किती फटका बसला असेल, याचा अंदाज येऊ शकतो. अनेक स्टॉलवाले दिवसभर ग्राहकांची प्रतीक्षा करताना दिसून आले. गेल्या वर्षीपेक्षा ४० टक्क्यांनी यंदा भाविकांची संख्या रोडावली आहे, अशी माहिती देवस्थान समितीने दिली.
मांगीरबाबांच्या चरणी गर्दी...
By admin | Updated: April 27, 2016 00:32 IST