लातूर : महानगरपालिकेच्या पथकाने गंजगोलाई परिसरात अचानक छापा मारा तब्बल १ क्विंटल १३ किलो प्लास्टिक कॅरीबॅग जप्त केली आहे़ सोमवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांच्या पथकाने कारवाई केली असून व्यावसायिकांना समज दिली आहे़ लातूर शहरात ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅगला बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे़ शहराच्या सर्वच भागातील गटारीमध्ये प्लास्टिक कॅरीबॅग पडल्याने गटारीही तुंबत आहेत़ नागरिकांना वारंवार मनपा प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे़ गंजगोलाई, बार्शी रोडवरील भाजीपाला बाजार, राजीव गांधी चौक, नवीन रेणापूर नाका आदी भागात कॅरीबॅगची विक्री अधिक आहे़ गंजगोलाईत तर ठोक विक्री करणारी अनेक दुकाने आहेत़ पथक कारवाईला येणार असल्याची कुणकुण लागताच संबंधित विक्रेते काही वेळासाठी दुकान बंद करून निघून जातात़ सोमवारी महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांनी गंजगोलाई परिसरात अचानक मोहीम राबविली़ यावेळी क्षेत्रिय अधिकारी संजय कुलकर्णी, स्वच्छता निरीक्षक कलीम शेख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी जवळपास दोन पोते प्लास्टिकच्या कॅरीबॅग जप्त केल्या़ हातगाडे, भाजीविक्रेते तसेच पिशव्यांची विक्री करणाऱ्या दुकानांवर या पथकाने छापा मारला़ सर्व भाजीविक्रेते व कॅरीबॅग विक्रेत्यांना तंबी देण्यात आली असून दुसऱ्यांना एकाच दुकानात कॅरीबॅग सापडल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना बजावण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
प्लास्टिकच्या धोकादायक एक क्विंटल कॅरीबॅग जप्त
By admin | Updated: December 14, 2015 23:53 IST