हिंगोली : रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या आढाव्यासाठी मागील तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या बैठकांना तात्पुरता विराम मिळाला आहे. तीन तालुक्यांचा आढावा झाला असून आणखी दोन तालुक्यांचे काम बाकी आहे.हिंगोली, कळमनुरी व औंढा तालुक्यांचा मागील तीन दिवसांत पूर्ण करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड, प्रभारी कार्यकारी अभियंता के. एस. हिरेमठ यांची उपस्थिती होती. तर तालुकानिहाय गटविकास अधिकारी विशाल राठोड, लक्ष्मण सुरुशे, पवार, उपअभियंता के. एम. संद्री यांची उपस्थिती होती.बुधवारी औंढा तालुक्यातील ३६ गावांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये फेब्रुवारीत बहुतांश कामे पूर्ण करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यात जानेवारी महिन्यातच ११ गावे, फेब्रुवारीत ११ गावे, मार्चमध्ये १, एप्रिलमध्ये ४ तर जूनमध्ये दोन कामे पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. त्या-त्या ठिकाणचे काम किती शिल्लक राहिले, यावरून हा कालावधी कमी अधिक प्रमाणात राहणार आहे. तर नव्या कामांना आणखी मुदत दिली आहे. कळमनुरी तालुक्यातील ४0 योजनांचा आढावा झाला. यात जानेवारीत १६, फेब्रुवारीत- २१, जून, डिसेंबरपर्यंत प्रत्येकी १ काम पूर्ण करण्यास सांगितले. एक काम नवीन आहे. काही ठिकाणी समितीत वाद असला तरी महावितरणकडून जोडणी न मिळाल्याने किंवा कोटेशनच स्वीकारले जात नसल्यानेही योजना ठप्प असल्याची उदाहरणे आहेत. समित्यांनी किरकोळ कामे बाकी ठेवल्याने हस्तांतरण न केलेली गावेही मोठ्या संख्येत आहेत. या गावांनी आता योजना पूर्ण करून न दिल्यास वसुली किंवा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्याचा मुद्दा आक्रमकपणे मांडण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
तीन तालुक्यांचा आढावा पूर्ण
By admin | Updated: January 13, 2016 23:59 IST