जालना : पाणलोट व्यवस्थापन हा जलयुक्त शिवार अभियानाचा पाया आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी मृद संधारण जल संधारण तसेच जमिनीची धूप थांबविण्यासाठी पाणलोट व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता घेण्याबरोबर गतवर्षातील जलयुक्त शिवार अभियानाची प्रलंबित असलेली कामे जूनअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव डी. के. जैन यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, खरीप हंगाम या विषयावर जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना जैन बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, विभागीय कृषी सह संचालक रमेश भताने, अधीक्षक कृषी अधिकारी (रोहयो) विलास रेणापूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दरशथ तांभाळे, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी लोणारे, कृषी उपायुक्त सुर्यकांत हजारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, अपर जिल्हाधिकारी डॉ. एन.आर. शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जैन म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. राज्यात सातत्याने पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे. जलयुक्त शिवार अभियानाची कामे करण्यासाठी गाविनहाय सूक्ष्म आराखडा तयार करुन दर्जेदार कामे होतील याकडे सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज जैन यांनी व्यक्त केली. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी मार्गदर्शन करून कामे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे व उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश जोशी यांनी पॉवर पाँईटच्या माध्यमातून विषयनिहाय माहिती दिली. यावेळी माजी खासदार अंकुशराव टोपे यांच्या निधनाबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
जलयुक्तची कामे जूनअखेर पूर्ण करा
By admin | Updated: April 4, 2016 00:33 IST