औरंगाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २ मे रोजी विविध वृत्तवाहिन्यांवर ओबीसी समाजाचे नेते, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना चूप बसा, जास्त बोललात तर महागात पडेल, अशी जाहीर धमकी दिल्याच्या निषेधार्थ मंगळवारी अखिल भारतीय समता परिषदेच्या औरंगाबाद जिल्हा शाखेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी तक्रार अर्ज दाखल केला.
ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालमधील विजयावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया नोंदवल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी ही धमकी दिली होती. पाटील यांच्याविरुद्ध जाहीररीत्या धमकावणे, सत्तेच्या जोरावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे याबद्दल तत्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा, असे पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.