नंदागौळ : राज्य शासनाच्या विशेष सहाय्य विभागाकडून २०११ पासून राज्यातील ग्रामीण भागातील भूमीहिन शेतमजूर किंंवा अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठी आम आदमी विमा योजना सुरू करण्यात आली. यासाठीच वार्षिक हप्ता २०० रूपये आहे. ते राज्य शासन १०० व केंद्र शासन १०० रूपये भरते. तसेच या योजनेस पात्र असलेल्या व्यक्तींचे अर्ज संबंधीत गावच्या तलाठ्यामार्फत भरून घेण्यात येतात. जर कुटूंब प्रमुखाचा नैसर्गिक मृत्यू आला तर ३० हजार रूपये, अपघाती मृत्यू ७५ हजार रूपये व अवयव निकामी झाल्यास ३७,५०० व दोन्ही अवयव निकामी झाल्यास ७५ हजार रूपये विमा संरक्षण देण्यात येते. त्यानुसार मागील तीन वर्षांत परळी तालुक्यात १२,४२१ एवढे कुटूंब आम आदमी विमा योजनेस पात्र ठरविण्यात आलेले आहेत. पात्रधारकांची पाल्य जर ९ वी ते १२ वी मध्ये शिक्षण घेत असतील तर त्यांना प्रतिमहिना १०० रूपये प्रमाणे १० महिन्यांचे १००० रूपये देण्यात येतात. २०११ ते २०२४ या वर्षात मिळून परळी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल केले, मात्र अद्यापपर्यंत एक रुपयाही विद्यार्थ्यांच्या हातावर पडलेला नाही. त्यामुळे परळी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शासनाकडे विमा कंपनी फंड असा एकूण ४४ लाख ८१ हजार रुपये एवढे येणे बाकी आहे. सर्वसामान्य विद्यार्र्थ्यांना शिष्यवृत्ती आलेली नसल्याने संबंधित विभागाबद्दल संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्ती का पोहोचली नाही? याचे उत्तर मात्र तहसीलदारालाही देता आले नाही. गटशिक्षणाधिकारी याबद्दल शांतच आहेत. शासनाकडून या शिष्यवृत्तीचा योग्य पाठपुरावा न झाल्यामुळे ४४८१ विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभापासून वंचित आहेत. संबंधित गावातील तलाठ्यांनी नाव नोंदणी करुन तहसीलदारांकडे अहवाल कळविणे आवश्यक असते, मात्र असा प्रकार तालुक्यात कोठेही नाही. याबाबत परळीचे तहसीलदार ए.टी. जटाळे म्हणाले, मागील तीन वर्षांतील आम आदमी शिष्यवृत्तीचे अर्ज विमा कंपनीकडे पाठविले आहेत. वंचित असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
आम आदमी विमा योजना नावालाच !
By admin | Updated: September 5, 2014 00:57 IST