औरंगाबाद : कोरोना संसर्गाचा जोर ओसरत असताना जिल्ह्याला ऑक्टोबरपेक्षाही नोव्हेंबरमध्ये अधिक दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबरमध्ये सुरुवातीच्या १३ दिवसांत १९८६ नव्या रुग्णांची वाढ झाली होती. मात्र, नोव्हेंबरमध्ये याच कालावधीत ५९ टक्के कमी म्हणजे ८२५ रुग्ण आहेत.कोरोनाने सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात रौद्र रूप धारण केले होते. रोज ३०० ते ४०० च्या घरात रुग्णांचे निदान होत गेले. शहरासोबत ग्रामीण भागामध्येही रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत होती.
या महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजारांवर पोहोचली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह प्रशासनावर प्रचंड ताण पडला. परिणामी, खाटा, आयसीयू खाटांसाठी रुग्णांना घेऊन एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयांत जाण्याची वेळ अनेक नातेवाईकांवर आली होती. बेड मिळण्यासाठी धावपळ अनेकांना करावी लागली; परंतु ऑक्टोबरमध्ये परिस्थिती निवळत गेली. हळूहळू स्थिती बदलली आणि रुग्णसंख्येत झपाट्याने घट झाली. या महिन्यात नव्या रुग्णांची भर पडण्याचे प्रमाण कमी झाले आणि कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. नोव्हेंबरमध्ये रुग्णसंख्येत आणखी घसरण सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून दुहेरी संख्येतच रुगणांची वाढ होत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या एक हजाराखाली कायम असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
प्रशासन नव्या आव्हानाच्या तयारीतदिवाळीत बाजारपेठेत खरेदीसाठी उसळलेल्या गर्दीने प्रशासनाला घाम फोडला असून तज्ज्ञांनीही दुसऱ्या लाटेचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्य शासनानेही तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या. सध्या परिस्थिती दिलासादायक असली तरी प्रशासन नव्या आव्हानाच्या तयारीत लागल्याचे चित्र घाटी, जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांत दिसून येत आहे.