औरंगाबाद : वर्दळीच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात गुंड, चोरटे सक्रिय झाले आहेत. सिद्धार्थ उद्यानाजवळ एका विद्यार्थ्यास गुंडाने लुटल्याची, तर कन्नड येथील शेतकऱ्याचा खिसा कापून दहा हजार पळविल्याची घटना मंगळवारी घडली.वाळूज परिसरातील शिवराई येथील अक्षय साबळे (१८) हा विद्यार्थी विवेकानंद महाविद्यालयात शिक्षण घेतो. महाविद्यालय सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे तो दुपारी साडेबारा वाजता शिवराईला जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकाकडे जात होता. कार्तिकी सिग्नलजवळ त्याला एका गुंडाने अडविले. ‘माझ्या मावस भावाला का मारहाण केली,’ अशी विचारणा त्याने केली. ‘माझे कोणाशीही भांडण झाले नाही,’ असे अक्षयने त्यास सांगितले. त्यावेळी गुंडाने त्याच्या खांद्यावर हात ठेवून गप्पा मारत सिद्धार्थ उद्यानापर्यंत आणले. ‘तुला मारायला आता चार- पाचजण येत आहेत,’ असे हा गुंड अक्षयला म्हणाला. त्याचवेळी अक्षयने मोबाईलवरून आपल्या वडिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. गुंडाने त्याच्या हातातील मोबाईल काढून घेतला. ‘मारहाण करणाऱ्यांपासून वाचायचे असल्यास माझ्यासोबत समर्थनगरकडे ये’, असे म्हणून गुंडाने अक्षयला समर्थनगरातील एका लॉजच्या पाठीमागे नेले. तेथे अक्षयच्या खिशातील रोख ३०० रुपये आणि मोबाईल हिसकावून त्याने पोबारा केला. अक्षयने क्रांतीचौक ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉलेजच्या विद्यार्थ्यास गुंडाने लुटले
By admin | Updated: August 3, 2016 00:17 IST