परभणी: राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, वाड्या, वस्त्या, तांडे येथील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांना त्यांच्या प्रकारानुसार जून महिन्यामध्ये स्त्रोत सांकेतांक देण्यात येणार आहे. यामुळे दूषित स्त्रोतावर योग्य त्या उपाययोजना करुन दूषित पाणी पिण्यामुळे ओढवणारे आजार टाळण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील गावे, वाड्या, वस्त्यामध्ये अस्तीत्वात असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची संपूर्ण माहिती एकत्रित करण्यासाठी गाव पातळीवरील सर्व स्त्रोतांवर गावाचा जनगणना क्रमांक, गाव, वस्ती, वाडी, तांडा क्रमांक, स्त्रोत प्रकार,गावातील एकूण स्त्रोतानुसार गुणानुक्रमांक यानुसार जलसुरक्षाकांच्या माध्यमातून सांकेतांक देण्यात येणार आहे. गावातील उपलब्ध सार्वजनिक स्त्रोतांपैकी ज्या स्त्रोताचा पिण्यासाठी जास्तीत जास्त लोक वापर करतात त्या स्त्रोतास गुणानुक्रमांक ०१ आणि त्या खालोखाल ज्या प्रमाणात पाणी स्त्रोताचा वापर होईल, त्यास ०२ सांकेतांक अशा प्रकारे उतरत्या क्रमाने पाणी स्त्रोताच्या वापरानुसार क्रमांक देण्यात येणार आहे, अशी माहिती जि.प. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम यांच्या वतीने देण्यात आली. संबंधित स्त्रोत सांकेतांकासाठी तालुकास्तरावरुन गटविकास अधिकारी व उपअभियंता तर जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंमरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एन.व्ही.करडखेलकर, पाणी गुणवत्ता तज्ज्ञ एस.मुशीर हाश्मी हे मार्गदर्शन करणार आहेत. (प्रतिनिधी) स्त्रोतावरील द्यावयाचे सांकेतांक योग्यरितीने पेंट करण्याकरिता व ते कायमस्वरुपी राहण्यासाठी पृष्ठभागी पिवळा रंग व त्यावरील अक्षरे काळ्या आॅईल पेंटच्या रंगामध्ये रंगविण्यात येणार आहेत.
पाण्याच्या स्त्रोतांना मिळणार सांकेतांक
By admin | Updated: May 14, 2014 01:07 IST