उस्मानाबाद : केरोसीन परवाना देण्यासाठी तक्रारदाराकडून १२ हजाराची लाच घेणाऱ्या जिल्हा पुरवठा अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे व लिपिक विजय अंकुशे या दोघांना ‘एसीबी’च्या पथकाने रंगेहात जेरबंद केले़ ही कारवाई सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातच करण्यात आली़पोलिसांनी सांगितले की, माळेवाडी (ता़भूम) येथील गुरूवर्य रामचंद्र बोधले महाराज महिला बचत गटाने केरोसीनचा परवाना मिळविण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह भूम येथील तहसील कार्यालयात प्रस्ताव पाठविला होता़ भूम येथील तहसीलदारांनी ती फाईल उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्याल्यातील जिल्हा पुरवठा विभागात पाठविली होती़ मंडळाच्या अध्यक्षांनी व त्यांच्या मुलाने परवान्याबाबत पुरवठा विभागात वारंवार चकरा मारून विचारपूस केली होती़ त्यावेळी पुरवठा अधिकारी भिकाजी घुगे यांनी ‘असली कामे पैसे दिल्याशिवाय होत नाहीत़ इतक्या चकरा मारण्याची गरजच नव्हती़ तुम्ही पैसे दिले असते तर कधीच काम झाले असते’ असे सांगितले़ त्यावेळी तक्रारदाराने ‘आमच्याकडे पैसे नाहीत, आमचे छोटे दुष्काळी गाव आहे़ शेतीपण चांगली नाही, पैसे कुठून द्यायचे’असे सांगितले़ त्यावेळी १५ हजार रूपये घेवून ये लगेच परवाना हातात देतो, असे घुगे यांनी सांगितल्याची तक्रार उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आली होती़ तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक डॉ़ डी़एस़स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक नेकलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी सोमवारी पुरवठा विभागात सापळा रचला़ तक्रारदाराचे काम करण्यासाठी उपजिल्हाधिकारी तथा पुरवठा अधिकारी घुगे यांनी १५ हजार रुपये लाचेची मागणी केली़ त्यावेळी १२ हजार रूपयांवर तडजोड झाली. ही लाच स्वीकारण्यास सांगितल्याने लिपीक विजय अंकुशे यांनी लाच घेतली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने कारवाई केली़ या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती़ (प्रतिनिधी)४कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने घुगे हे राहत असलेल्या उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहातील रूममध्ये झाडाझडती घेतली़ तसेच त्यांच्या औरंगाबाद, नांदेड व इतर घरांमध्येही कारवाई करून झाडाझडती करण्यासह बँक खात्यांचीही तपासणी सुरू करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले़४गत काही महिन्यापूर्वी शेतकऱ्यांना मावेजा देण्यासाठी लाच घेताना उपविभागीय अधिकारी शोभा राऊत यांना एसीबीने जेरबंद केले होते़ त्यानंतर सोमवारी दुसरे उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांना एसीबीने रंगेहाथ जेरबंद केले आहे़ त्यामुळे महसूलमधील लाचखोरी चव्हाट्यावर आली असून, लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत़
‘डीएसओ’सह लिपिक चतुर्भूज
By admin | Updated: December 23, 2014 00:05 IST