हिंगोली : शहरातील स्वच्छतेचा प्रश्न उन्हाळ्यात गंभीर झालेला असल्याने पावसाळ्यात त्याची तीव्रत्ता अधिक जाणवणार आहे. अस्वच्छतेमुळे पावसाळ्यापूर्वी शहराची स्वच्छता हाती घेणे महत्वाचे आहे. यामुळे मान्सूनच्या आगमनापूर्वी नगरपरिषदेने संपूर्ण शहर स्वच्छ करण्याची मागणी होत आहे. शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून शहरातील नाल्या व गटारी तुंबल्या असल्याने जागोजागी कचर्याचे ढीग साचले आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वच्छतागृहांचे आऊटलेट नाल्यात सोडून दिले आहेत. नाल्या तुंबल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डासांच्या चाव्याने तापाचे रुग्ण वाढले आहेत. उकंड्यावर डुकरे व त्यांच्या पिलांचा मुक्त संचार वाढल्यामुळे स्वाईन फ्ल्यूचा धोका निर्माण झाला आहे. दसर्यासाठी राखीव असलेल्या रामलीला मैदानावर सर्वात मोठा उकंडा व कचरा डेपो तयार झाला आहे. जुने ग्रामीण पोलिस ठाणे, भाजी - मंडई, जुना सरकारी दवाखाना, तोफखाना, पेन्शनपुरा, मंगळवारा, शास्त्रीनगर, शिवाजीनगर, तलाब कट्टा आदी भागात कचरा रस्त्यावर टाकण्यात येत आहे. नगरपरिषदेच्या कचराकुंड्यांचा वापर नागरिक करण्याची गरज असताना अनेकजण ते टाळताना दिसतात व बेजबाबदारपणे वागतात. जुन्या शहरातील तोफखाना, मंगळवारा, भोईपुरा, कोमटी गल्ली, कासारवाडा, कुंभारवाडा, मंगळवारा, गाडीपुरा, पेशनपुरा, आंबिका टॉकीजजवळील भाग, भाजी मंडी, पोस्ट आॅफीस रोड, सिद्धार्थनगर आदी भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. नाल्या व गटारी तुंबल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. नगरसेवक व स्वच्छता निरीक्षकांच्या दुर्लक्षाने सफाई कामगार थातूरमातूर नाल्या उपसून आपले कर्तव्य बजावतात. मुसळधार पावसामुळे गल्लीबोळात गटाराचे पाणी अनेक घरांत शिरते. आता मान्सून जवळ आला आहे म्हणून स्वच्छता मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. नाल्या व गटारी तळापासून उपसण्याची गरज आहे. डासांच्या प्रार्दुभाव रोखण्यासाठी किटकनाशक व धूरफवारणी करण्याची आवश्यक आहे. त्यादृष्टीने नगरपरिषदेने नियोजन व अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
मान्सूनपूर्वी स्वच्छता आवश्यक
By admin | Updated: May 14, 2014 23:54 IST