हिंगोली : निकाल उंचावण्याची परंपरा सलग तिसर्या वर्षी कायम राहिली. यंदाही परीक्षार्थ्यांनी घवघवीत असे ९०.७१ टक्के यश संपादन करीत विभागात तिसर्या क्रमांकावर झेप घेतली. प्रामुख्याने मुलांपेक्षा ४ टक्क्यांनी आघाडी घेत एकूण ९३.५१ टक्के अधिक गुण घेवून बाजी मारली. दुसरीकडे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक ९३.७३ तर वाणिज्य शाखेच्या ९३.३५ टक्के घेवून कला आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना मागे टाकले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च महिन्यात बारावीच्या परीक्षा झाल्या होत्या. यंदा या परिक्षेसाठी कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी एकूण ८ हजार ४४२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यातील ८ हजार ४४२ विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली होती. सोमवारी या विद्यार्थ्यांच्या जाहीर झालेल्या निकालात ७ हजार ६३९ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. निकालात गतवर्षी ४२५ विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढून यंदा ७४६ परीक्षार्थ्यांनी बाजी मारली. दुसरीकडे निकालात यंदा औंढा नागनाथ तालुक्याने आघाडी घेत ९२.०९ टक्के गुण मिळविले. तालुक्यात परिक्षेला नोंदणी केलेल्या ६३३ पैकी ६३२ जणांनीच परीक्षा दिली. या परीक्षेत ५८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उल्लेखणीय बाब म्हणजे या तालुक्यातील मुलींचा निकाल ९६.१५ टक्के लागला असून त्यात उत्तीर्ण होण्यात ८ विद्यार्थिनीला अपयश आले. अपेक्षेप्रमाणे कला शाखेत सर्वाधिक ४ हजार ६४३ पैकी ४ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात उत्तीर्ण झालेल्या ४ हजार १६० जणांत ५७३ परीक्षार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले; परंतु कला शाखेचा सर्वात कमी म्हणजे ८९.७७ टक्के निकाल लागला. विशेषत: वाणिज्य शाखेच्या निकालात ८ टक्यांची भर पडत यंदा ९३.३५ टक्क्यांवर निकाल गेला. जिल्हाभरातून ६६२ पैकी ६६२ विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षत ६१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी चारही शाखांतून पहिला क्रमांक मिळविला. एकूण ३२० पैकी ३१९ विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षत २९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षीपेक्षा यंदा सर्वच शाखांचा निकाल उंचावला आहे. गतवर्षी ७ हजार ६७४ पैकी ७ हजार ४५३ विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली होती. त्यात ६ हजार २६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा ७ हजार ६३९ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल उंचावल्याबरोबर यंदा जिल्ह्याने मराठवाड्यात तिसर्या क्रमांकावर येण्याचा बहुमान मिळविला आहे. (प्रतिनिधी)
फेब्रुवारी-मार्च महिन्यात बारावीच्या परीक्षेसाठी कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी एकूण ८ हजार ४४२ विद्यार्थ्यांनी केले होते अर्ज. जिल्हाभरात एकूण ८ हजार ४४२ विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिलेल्या परीक्षेचा सोमवारी जाहीर झालेल्या निकालात ७ हजार ६३९ विद्यार्थ्यांनी केले यश संपादन. कला शाखेत ४ हजार ६४३ पैकी ४ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेत ४ हजार १६० पराक्षार्थी उत्तीर्ण झाले असून त्यातील ५७३ परीक्षार्थ्यांनी विशेष प्राविण्य कमाविले. वाणिज्य शाखेच्या निकालात ८ टक्यांची भर घालत यंदा ९१.३० टक्क्यांवर गेला असून जिल्ह्यात यंदा ६१८ विद्यार्थी झाले उत्तीर्ण. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी यंदा पहिला क्रमांक पटकावला असून एकूण ३२० पैकी ३१९ जणांनी परीक्षा दिली. तर २९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले . औंढा तालुक्यात बसलेल्या ६३३ पैकी ६३२ परीक्षार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेत ५८२ विद्यार्थी झाले उत्तीर्ण.
पुनर्परीक्षार्थ्यांमध्ये मुलांनी मारली बाजी
हिंगोली : जिल्ह्यात यंदा पुनर्परीक्षार्थ्यांचा निकाल उंचावला आहे. मागील वर्षी ३२.२४ टक्क्यांपर्यत लागलेला निकाल यंदा ३९.३० टक्क्यांवर पोहोचला आहे. उल्लेखनीय म्हणजे सर्व निकालात मुलींनी आघाडी घेतली असताना यात मात्र मुलांनी ३९.५७ टक्के गुण घेत यश मिळविले. जिल्ह्यात यंदा ५३० पुनर्परीक्षार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते; परंतु ५१४ विद्यार्थीच या परीक्षेला बसले. सोमवारी निकाल हाती आल्यानंतर त्यातील केवळ २०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे दिसून आले. प्रामुख्याने या निकालात मुलांनी आघाडी घेत बाजी मारली. मुलांमध्ये ३८१ पैकी ३७४ जणांनी दिलेल्या परीक्षेत १४८ विद्यार्थ्यांनी बाजी मारली. दुसरीकडे १४१ पैकी १४० विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती. त्यातील ५४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. यंदा मुलींनी ३८.५७ तर मुलांनी ३९.५७ टक्के गुण घेत घेतलेल्या आघाडीचे कोतुक होत आहे. (प्रतिनिधी)