लातूर : लातूर तालुक्यातील खंडापूर येथे कायमस्वरूपी इंग्रजी शिक्षक द्यावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात शाळा भरविली. शिक्षक दिल्याशिवाय उठणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने अखेर शिक्षणाधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी शिक्षक देण्याचा निर्णय घेतला.लातूर तालुक्यातील खंडापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग चालतात़ या शाळेत विद्यार्थी संख्याही २१० पर्यंत आहे़ परंतु, इंग्रजी विषयाचे शिक्षण देणारा शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ तरीही शिक्षण विभाग या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत नाही़ २९ डिसेंबर २०१४ पासून या शाळेत इंग्रजी विषयाचे शिक्षण देणाऱ्या प्राथमिक पदवीधर शिक्षकांचे पद रिक्त आहे़ याबाबत गावचे उपसरपंच संजय पाटील खंडापूरकर व शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ यांनी ६ फेब्रुवारी २०१५ रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला होता़ त्यावेळी पोलिस प्रशासनाच्या अधिकाऱ्यासमवेत प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसात शिक्षक देण्याचे आश्वासन दिले हाते़ याबाबत दहावेळा पाठपुरावा करूनही टोलवाटोलवीची उत्तरे दिली़ तसेच सततच्या पाठपुराव्यामुळे इंग्रजी शिकविणाऱ्या शिक्षकाऐवजी इतिहास शिक्षक पाठवून खंडापूर जिल्हा परिषद शाळेची खिल्ली उडविली. शिक्षण विभागाच्या या मनमानी कारभारामुळे खंडापूर येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात तीन तास शाळा भरविली़ यावेळी विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांची उपस्थिती होती़ यावेळी जि़प़सदस्य राजकुमार पाटील, किशनराव लोमटे यांची उपस्थिती होती़ विद्यार्थी, पालक, गावातील ग्रामस्थांनी शिक्षक दिल्याशिवाय उठणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने अखेर शिक्षणाधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी शिक्षक दिला. (प्रतिनिधी)
शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात विद्यार्थ्यांचा वर्ग
By admin | Updated: March 17, 2015 00:42 IST