जालना: जालना नगर पालिकेचे कर अधीक्षक हरिश्चंद्र आंधळे यांना पालिकेचा भूखंड भाडेतत्वावर देण्याची मागणीवरून सुनील साळवे याने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या प्रकाराने पालिका कर्मचाऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे. शहरातील ओम नगर भागात पालिकेचा मोकळा भूखंड आहे. हा भूखंड भाडेतत्वावर देण्याची मागणी सुनील साळवे याने केली होती. मात्र भूखंड भाडेतत्वावर देता येत नाही असे आंधळे यांनी साळवे याला सांगितले. यावरून आंधळे व साळवे यांच्यात वाद होऊन साळवे याने आंधळे यांना मारहाण केली. अचानक घडलेल्या प्रकाराने पालिकेत एकच खळबळ उडून मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे आंधळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
नगर पालिकेत कर अधीक्षकास मारहाण
By admin | Updated: April 1, 2017 00:24 IST