निवृत्ती गवळी , औरंगाबादऔरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेपासून डीसीपी-एसीपीसारख्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त राहण्याची परंपरा कायम आहे. शहरात पोलीस उपायुक्त (मुख्यालय) पद तीन महिन्यांपासून, तर गुन्हे शाखेचे सहायक आयुक्तांचे पद अडीच वर्षांपासून रिक्तच आहे. तिकडे ग्रामीण पोलीस दलातही उपअधीक्षक (गृह) पद भरले गेलेले नाही.पद रिक्त राहण्याचे कारण प्रशासकीय बाब सांगण्यात येत असली तरी वाढता कामाचा ताण, शहरात राजेंद्र सिंह आणि ग्रामीणला ईशू सिंधूसारखे शिस्तीचे कडक वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे बाहेरून पोलीस अधिकारी येथे सहजासहजी यायला धजावत नाही. परिणामी आहे त्या अधिकाऱ्यांकडूनच कामे करून घेतली जात आहेत. विशेष म्हणजे शहरात तब्बल ७ एसीपी असूनही गुन्हे शाखा पदाच्या लायकीचा एकही अधिकारी वरिष्ठांच्या नजरेत अजून तरी आलेला नाही. म्हणूनच की काय जमेल त्याप्रमाणे निरीक्षकच एसीपीचेही काम करीत आहेत.गुन्हेगारी वाढतेयजगाच्या नकाशावर आणि देशातील प्रमुख महानगरांपैकी संवेदनशील शहर म्हणून औरंगाबादचा उल्लेख होतो. शहरात रोज कोणता ना कोणता बंदोबस्त असतोच. राज्य व देशात काही गडबड झालीच तर येथे पोलिसांना अलर्ट राहावे लागते. दहशतवादाची पाळेमुळे औरंगाबादपर्यंत पोहोचलेली अनेक उदाहरणे समोर आली आहेत. दुसरीकडे चोऱ्या, खून, मंगळसूत्र चोरी, तोतये पोलीस, लूटमारसारख्या घटनांनी सामान्य नागरिकांबरोबर पोलिसांचीही झोप उडविली आहे. अशा वेळी तपासाच्या दृष्टीने गुन्हे शाखेकडून उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जाते.डीसीपी-एसीपीचा खो- खोचा खेळतत्कालीन पोलीस उपायुक्त (मुख्यालय) सोमनाथ घार्गे यांची २७ फेब्रुवारी २०१४ रोजी अमरावतीला बदली झाली. तेव्हापासून हे पद रिकामेच आहे. शहर गुन्हे शाखेचे तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त दीपकसिंग गौर फेब्रुवारी २०१२ मध्ये सेवानिवृत्त झाले. गेल्या अडीच वर्षांत गुन्हे शाखेला एसीपी मिळालेला नाही. नंतर अनेक एसीपींनी जिवाचा आटापिटा केला; पण तत्कालीन आणि वर्तमान, अशा दोन्ही पोलीस आयुक्तांनी एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे पदभार न देता पोलीस निरीक्षकावरच या पदाची जबाबदारी सोपविली जात आहे.वरिष्ठ-कनिष्ठ वादसध्या गुन्हे शाखेच्या एसीपीचा पदभार पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्याकडे आहे. शहरात सध्या ७ एसीपी कार्यरत आहेत, तर दुसरीकडे अनेक ठाण्यांचे निरीक्षक आघाव यांना वरिष्ठ आहेत. त्यामुळे आघाव यांना प्रभारी एसीपी म्हणून काम पाहणे अथवा करून घेणे कसरतीचे झाले आहे. म्हणूनच की काय जवळपास सर्वच शाखा आणि पोलीस ठाण्यात निरीक्षकांनी आपल्या नावाच्या पाटीवर ‘वरिष्ठ निरीक्षक’ असे आवर्जून लिहिणे सुरू केले आहे. परिणामी वरिष्ठ-कनिष्ठ असा नवाच वाद आता सुरू झाला आहे. यात मात्र, गुन्हेगार हात धुवून घेत आहेत.ग्रामीणचीही तीच अवस्थाऔरंगाबाद जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील महत्त्वाचे समजले जाणारे उपअधीक्षक (होम) पद गेल्या चार महिन्यांपासून रिक्त आहे. तत्कालीन उपअधीक्षक संदीप जाधव यांची चाळीसगावला बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणालाही नेमणूक मिळालेली नाही. परिणामी चिकलठाणा ग्रामीणच्या उपअधीक्षक कल्पना बारावकर दोन्ही पदे सांभाळत आहेत. डीसीपी, एसीपी आणि डीवायएसपीची रिक्त पदे केव्हा भरली जाणार, असा प्रश्न आहे.
शहर पोलिसांना एसीपी-डीसीपी मिळेना
By admin | Updated: July 25, 2014 00:49 IST