औरंगाबाद : सातारा परिसरातील धोकादायक पुलासाठी जिल्हा प्रशासनाने डीपीटीसीमधून मंजुरी देऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला; परंतु अद्यापही काम सुरू होत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ सातारा- देवळाई विकास संघर्ष कृती समितीने ‘कुठे नेऊन ठेवलाय पूल आमचा?’ म्हणत पुलावरच मुंडण आंदोलन केले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोनदा पुलाचे उद्घाटनही झालेले आहे. मंजुरी झाली, टेंडर निघाले, अशी विविध प्रकारची आश्वासने नागरिकांना देणे सुरू आहे. नगर परिषद स्थापन झाली असून, निवडणुकीचे वेध लागले आहेत. तरीदेखील पुलाचा प्रश्न रेंगाळलेला आहे. या पुलावरून सुधाकरनगरकडे जाणाऱ्यांची मोठी वर्दळ असते. विविध सोसायट्या व शाळा, महाविद्यालय या भागात असल्याने शाळकरी मुलांची ने-आण करणाऱ्या वाहनांची संख्या या भागात सतत असते. पावसाळ्यात या पुलावर शाळकरी मुलांची बस अडकली होती. एक वाहन वाहून गेल्याने एकाचा प्राणही गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या धोकादायक पुलाची पाहणी करून जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी तात्काळ दोन पुलांना डीपीटीसीतून मंजुरी दिली आहे. दोन्ही पुलांचे उद्घाटन झाले; मात्र अद्याप कोणतेही काम सुरू झालेले नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी मुंडण आंदोलन केले.
पुलासाठी केले नागरिकांनी मुंडण
By admin | Updated: December 26, 2014 00:15 IST