औरंगाबाद : केंद्र शासनाकडून औरंगाबाद शहराला मुबलक प्रमाणात लसीचा साठा मिळत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. शुक्रवारी रात्री मनपाला फक्त ६ हजार डोस प्राप्त झाले. शनिवारी दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांनी प्रत्येक केंद्रावर अलोट गर्दी केली होती. अनेकांना टोकन न मिळाल्याने परत फिरावे लागले. रविवारी लसीकरण बंद राहणार आहे. लसींचा साठा प्राप्त झाला तरच सोमवारी लसीकरण होईल, अन्यथा नाही, अशी स्थिती आहे.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी शहरातील ७० टक्के नागरिकांचे लसीकरण झालेच पाहिजे यादृष्टीने मनपा प्रशासन प्रयत्न करीत आहे; मात्र केंद्र शासनाकडून पुरेसे पाठबळ मिळायला तयार नाही. तुटपुंज्या स्वरूपात लसींचा साठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. दररोज २० हजार नागरिकांना डोस देण्याची व्यवस्था केलेली असताना फक्त ५ ते ६ हजार लसींचा साठा देण्यात येत आहे. शनिवारी लसीचा साठा मिळताच ३९ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था केली. सकाळपासून दुसरा डोस घेण्यासाठी केंद्रावर नागरिकांची गर्दी उसळली. पहिला डोस घेण्यासाठी कोविन अॅपवर ऑनलाइन नोंदणी करण्याची अट टाकण्यात आल्यामुळे पाच केंद्रांवर गर्दी झाली नाही. ६ हजार लसीचे वितरण प्रत्येक केंद्रावर दीडशे लसीप्रमाणे करण्यात आले. अवघ्या चार तासात केंद्रावरील लसींचा साठा संपला. केवळ २०० ते २५० लसी शिल्लक राहिल्या आहेत. दरम्यान, उद्या रविवार असल्यामुळे लसीकरणाला सुटी राहणार असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत साठा मिळाला तर सोमवारी लसीकरण शक्य आहे. अन्यथा सोमवारीही मोहीम बंद ठेवावी लागणार आहे.