शेषराव वायाळ , परतूरपरतूर नगर पालिकेचे मागील पंचवर्षांपासूनचे ‘विशेष लेखा परिक्षण’ सुरू असून, यामुळे नागरिकांची दैनंदिन कामे खोळंबली आहेत. या परीक्षणामुळे कर्मचारीही त्रस्त झाले आहेत. परतूर नगर पालिकेचे मागील पंचवीस वर्षाचे म्हणजे १९९० ते २०१३-१४ पासूनचे विशेष लेखा परीक्षण सुरू आहे. या परीक्षणासाठी परभणी व जालना येथून स्थानिक निधी लेखा विभागतील अधिकारी पालिकेत मागील तीन ते चार महिन्यांपसून ठाण मांडून आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी पालिकेचे लेखा परीक्षण होत असते व हे झालेले आहे. तसेच यात काही आक्षेपार्ह नोंदीही नसल्याचे सांगण्यात येते. मग हे विशेष लेखा परीक्षण कशासाठी हा सध्या शहरात चर्चेचा विषय झालेला आहे. हे लेखा परीक्षण सुरू असल्याने नगर पालिकेचे सर्व कर्मचारी या परीक्षणासाठी आलेल्या पथकाच्या दिमतीला आहेत. पंचवीस वर्षाची जुनी कागदपत्रे उपलब्ध करून देणे इतर पूरक महिती देणे यातच पालिकेतील कर्मचाऱ्यांचा वेळ जात आहे. शहरात नवीन पाणीपुरवठा योजना, स्वच्छता, कर वसुली आदी कामांवरही परिणामी होत असल्योच चित्र आहे. राष्ट्रीय स्वच्छता अभियान अंतर्गत शौचालय बांधकामे होत आहेत. यासाठी पालिकेत नागरिकांची गर्दी होत आहे. नगर पालिकेतील नगर सेवक व पदाधिकारी यांच्याकडे कामे होत नसल्याच्या तक्रारींचा पाढा नागरिक वाचत आहेत. परंतु या लेखा परीक्षणामुळे नगर पालिकेतील सर्व यंत्रणाच हतबल झाली आहे.या प्रकारामुळे पालिकेचे पदाधिकारीही इकडे फिरकेनासे झाले आहेत. एकूणच या लेखा परीक्षणामुळे शहरातील बरीच महत्वाची कामे खोळंबली आहेत. व लेखा परिक्षण सद्या शहरात चर्चेचा विषय बनले आहे. नागरिकांची कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी विशेष कर्मचारी नेमावेत, अशी मागणीही जनतेतून जोर धरत आहे.
नागरिकांची दैनंदिन कामे खोळंबली; कर्मचारीही त्रस्त
By admin | Updated: January 3, 2016 23:57 IST