बीड : ख्रिसमस नाताळ सण रविवारी जिल्हाभरात मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने ठिकठिकाणच्या चर्चमध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल पहावयास मिळाली. येथील अॅसेम्बलीज आॅफ गॉड चर्चमध्ये येशंूच्या जीवनावर आधारित गाण्यांचे सादरीकरण झाल्याने वातावरण भक्तीमय झाले होते. सायंकाळी निघालेल्या मिरवणुकीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले.अॅसेम्बलीज आॅफ गॉड चर्चमध्ये झालेल्या कार्यक्रमप्रसंगी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर अध्यक्षस्थानी होते. यावेळी रो. पी. एल. सोनवणे, रो. लॉरेन्स (पुणे) यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी रो. सोनवणे यांनी येशूंच्या जीवनकार्याचा पट उलगडताना उपस्थितांना नाताळ सणाचे महत्त्व सांगितले. येशूंचे विचार आचारणात आणण्याचे आवाहन त्यांनी केले.सामूहिक प्रार्थना पार पडली. स्तूती आराधना गितांनी उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते. अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे, नितीन शिंदे, अशोक थोरात, सुधीर इंगळे, अमृत सोनवणे, आतिष काळे यांची उपस्थिती होती. सायंकाळी शहरातील माळीवेस भागातून मिरवणूक काढण्यात आली. प्रमुख मार्गांवरून निघालेली ही मिरवणूक विद्याभवन चर्चमध्ये पोहोचून तेथे समारोप झाला. आष्टी, अंबाजोगाई, गेवराई, उमापूर, चौसाळा येथे देखील विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
नाताळ उत्साहात
By admin | Updated: December 25, 2016 23:50 IST