वाशी : मागील आठ दिवसांपासून तालुक्यातील सरमकुंडी येथे चिकुन गुनियाच्या साथीने थैमान घातले आहे. चार दिवसांपूर्वी या ठिकाणी आरोग्य विभागाची ८ पथके कार्यरत होती. मात्र रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर कर्मचारी कमी करण्यात आले. असे असतानाच शुक्रवारी आणखी नऊ रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. सरमकुंडी येथे चिकुन गुनियाच्या साथीने पाय पसरले आहेत. आबालवृद्ध या आजाराने त्रस्त झाले आहेत. १५ दिवसांपूर्वी या गावामध्ये रुग्णांची संख्या प्रचंड वाढली होती. असे असतानाच एका महिलेचाही चिकुन गुनिया सदृश्य आजाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोग्य खाते खडबडून जागे झाले. याठिकाणी लागलीच आरोग्य कर्मचार्याची ८ पथके पाचारण करण्यात आली होती. ही पथके मागील ३-४ दिवसापर्यंत गावात तळ ठोकून होती. त्यामुळे रुग्णांची संख्या कमी झाली. हे लक्षात आल्यानंतर आरोग्य विभागाने येथील पथके कमी केली. शुक्रवारी तर या गावात एकही पथक नव्हते. आरोग्य विभागाने सुटकेचा श्वास सोडला असतानाच शुक्रवारी पुन्हा चिकुन गुनियाच्या साथीने डोके वर काढले आहे. दिवसभरात ताप आणि सांधे दुखीने त्रस झालेले जवळपास ९ रुग्ण येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. या प्रकारामुळे आरोग्य विभागाचीही झोप उडाली आहे. ही संख्या वाढू लागल्याचे ग्रामस्थांतून सांगण्यात येत आहे. (वार्ताहर)चिकुन गुनियाची साथ पूर्णत: आटोक्यात येण्यापूर्वीच आरोग्य विभागाने पथके कमी केली. याचाच परिणाम म्हणून रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे येथे पुन्हा आरोग्य कर्मचारी तैनात करावेत, अशी मागणी सरमकुंडी येथील तात्यासाहेब गायकवाड यांनी केली आहे.
चिकुन गुनिया आटोक्यात येईना !
By admin | Updated: May 31, 2014 00:32 IST