छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही वर्षांत छत्रपती संभाजीनगरचा चारही बाजूंनी झपाट्याने विस्तार होत आहे. यातूनच वीज ग्राहकांमध्येही वाढ होत असून, दरवर्षी १५ ते १६ हजार नवीन वीजजोडण्या म्हणजेच नवे वीज ग्राहकांची भर पडत आहे. गेल्या ८ वर्षांत छत्रपती संभाजीनगर शहरात सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांची संख्या तब्बल साडेतीन लाखांवर गेली आहे आणि त्यांचे मासिक बिल सुमारे १८० कोटी रुपये होते.
शहरात २०१७-१८ पासून प्रत्येक आर्थिक वर्षात नव्या वीज ग्राहकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. दरवर्षी सरासरी १५ हजारांहून अधिक ग्राहकांची भर पडत आहे. कोरोना काळात घट झाल्यानंतर पुन्हा २०२३-२४ मध्येही संख्या १६ हजारांवर गेली. तर २०२४-२५ मध्ये डिसेंबरपर्यंतच ८,८२१ नव्या ग्राहकांची नोंद झाली आहे. या वाढीचा वेग पाहता महावितरणच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
- वाळूज एमआयडीसीसह शहरात एकूण ग्राहक सध्या ३ लाख ५९ हजार ४८०- मासिक बिल सुमारे १८० कोटी रुपये- सध्या शहर मंडळात ३३ केव्हीची २८ उपकेंद्रे
कोणत्या वर्षी किती नवीन वीज ग्राहक?आर्थिक वर्ष- नवीन वीज ग्राहक२०१७-१८ : १६,११९२०१८-१९ : १७,२४८२०१९-२० : १६,७९८२०२०-२१ : १२,९०६२०२१-२२ : १५,२५१२०२२-२३ : १४,६१२२०२३-२४ : १६,४०६२०२४-२५ (डिसेंबर २४पर्यंत) : ८,८२१
घरगुती वीज ग्राहक ७० टक्क्यांवरवर्षभरात वाढणाऱ्या वीज ग्राहकांमध्ये घरगुती वीज ग्राहकांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ७० टक्क्यांवर आहे. शहराच्या ऊर्जा मागणीला पूर्ण करण्यासाठी महावितरणकडून पुढील २५ वर्षांसाठी विस्तृत नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागात २२० केव्ही क्षमतेचे नवीन सबस्टेशन उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे.
पुढील २५ वर्षांचा विचारदिवसेंदिवस वीज ग्राहक वाढत आहेत. दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. महावितरणच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. पुढील २५ वर्षांच्या दृष्टीने शहराच्या मध्यवर्ती भागात २२० केव्हीचे सबस्टेशन साकारण्यासाठी जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.- पवनकुमार कछोट, मुख्य अभियंता, छत्रपती संभाजीनगर परिमंडळ