सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोबाईल वरून कसे बोलावे, यासाठी शासनाने एक आदर्श संहितेचे परिपत्रक काढले आहे. पण, या परिपत्रकाचे सर्वात आधी राज्यातील सर्व सनदी अधिकाऱ्यांनी नीट आणि योग्य पालन करावे, अशी सर्वसाधारण कर्मचाऱ्यांमध्ये कुजबुज आहे. हाताखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याही वरिष्ठांकडून काही अपेक्षा असतात. मोबाईलवर सभ्यपणे बोलावे, सतत २४ तास मेसेज पाठवू नये, ऑफिशियल ग्रुपवर नोटिसा, ज्ञापन, निलंबनाची धमकी देणारे मेसेज पाठवू नये, सोशल (सोशिक) मीडियावर सतत पहारा देऊ नये. स्वत:च्या खासगी गोष्टी जसे; शरीराचे तापमान, ऑक्सिजन लेवल, पल्स रेट, स्वत:चे फोटो, कुत्र्यासोबतची मैत्री दर्शविणारे फोटो, भटकंती, भंकस कविता व अर्थहीन शेरोशायरी इत्यादी बाबी सोशल मीडियातून टाकू नये, यामुळे आपली प्रतिमा काही उंचावणार नाही. जगात केवळ आपणच एकमेव कार्यक्षम अधिकारी असून इतर सगळी जनता आणि हाताखालील अधिकारी व कर्मचारी वेडे आहेत, अशा अविर्भावात सतत वागू नये, असे खालच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाटत असते. वरील सर्व गोष्टी जरी या परिपत्रकात नमूद नसल्या तरी या गोष्टींमुळे हाताखालील अधिकारी व कर्मचारी हैराण असल्याचे मेसेज सोशल मीडियातून फिरू लागले आहेत.
आधी सनदी अधिकाऱ्यांनी परिपत्रकाचे पालन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:02 IST