औरंगाबाद : गणरायाला निरोप देण्यासाठी श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत शहरातील सुमारे दीड हजार सार्वजनिक गणेश मंडळे सहभागी होणार आहेत. मिरवणूक असलेल्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, तसेच मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी या मार्गांवरील वाहतूक सोमवारी सकाळी ११ ते मध्यरात्रीपर्यंत दुसऱ्या मार्गांनी वळविण्यात आली आहे.याविषयी पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी स्वतंत्र अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार शहागंजकडून सिटी चौकाकडे जाणारी वाहने चेलीपुरा चौक- लोटा कारंजा- कामाक्षी लॉज चौक या मार्गाने जाणार आहेत. क्र ांती चौकाकडून गुलमंडी- सिटी चौकाकडे जाणारी वाहने सिल्लेखाना- वीर सावरकर चौक, कार्तिकी हॉटेल चौक, मिल कॉर्नरमार्गे भडक लगेट या मार्गाने जाणार आहेत. मिल कॉर्नरकडून औरंगपुऱ्याकडे येणारी सर्व वाहने अंजली थिएटरपासून डावीकडे खडके श्वर येथून महानगरपालिका कार्यालय मार्गाने जाणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टीव्ही सेंटरकडे जाणाऱ्या वाहनांना साठे चौक- दिल्लीगेट- उद्धवराव पाटील चौक मार्गाने पुढे सिद्धार्थ चौक, असा प्रवास करावा. गारखेडा, पुंडलिकनगर रोडवरील पतियाळा बँकेकडून गजानन महाराज मंदिराकडे जाणारी वाहने हिंदू राष्ट्र चौक, विजयनगर, गजानन कॉलनी, रिलायन्स मॉलमार्गे जातील. जवाहरनगर पोलीस ठाण्याकडून गजानन महाराज मंदिराकडे जाणारी वाहने ही माणिक हॉस्पिटल, डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या मागून त्रिमूर्ती चौकामार्गे वळविण्यात आली आहेत. त्रिमूर्ती चौकाकडून गजानन महाराज मंदिराकडे येणारी वाहने डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या मागील रस्त्याने माणिक हॉस्पिटल, जवाहरनगर पोलीस ठाणे या मार्गे जातील. सेव्हन हिल उड्डाणपुलाकडून गजानन महाराज मंदिराकडे जाणारी वाहने जालना रोड मार्गे आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक अशी जातील. या आदेशाचे सर्व वाहनचालकांनी पालन करणे कायद्याने बंधनकारक आहे. तसेच नो एन्ट्रीमध्ये वाहने घालणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे.मुख्य मिरवणूक संस्थान गणपती- शहागंज- चमन- महात्मा गांधी पुतळा- सिटीचौक- गुलमंडी- बाराभाई ताजिया- औरंगपुरा येथील जिल्हा परिषद मैदानावर जाईल. सिडकोतील मिरवणूक चिश्तिया कॉलनी चौक- आविष्कार चौक, बजरंग चौक- बळीराम पाटील हायस्कूल चौक- पार्श्वनाथ चौक- शिवनेरी कॉलनी- जिजामाता चौक- टीव्ही सेंटर चौक मार्गे एन-१२ येथील विहीर येथे पोहोचेल.नवीन शहर सार्वजनिक गणेश मंडळांची गणपतींची मिरवणूक गजानन महाराज मंदिर चौक मार्गे सुरू होईल. ही मिरवणूक जवाहरनगर पोलीस ठाण्यामार्गे गारखेडा सूतगिरणी चौक येथून शिवाजीनगर येथील विसर्जन विहीर येथे पोहोचेल.गणेश मंडळांच्या भंडाऱ्याने दिवस गाजलागणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी रविवारी अनेक गणेश मंडळांनी भंडाऱ्याचे आयोजन केले होते. शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती ट्रस्टने आज महाभंडारा आयोजित केला होता. पंगतीमध्ये प्रसाद वाटण्यात आला. याशिवाय परिसरातील दुकाने व घराघरांत प्रसाद देण्यात आला. क्रांतीचौक येथील गणेश मंडळाने भंडाऱ्याची परंपरा यंदाही कायम ठेवली. जुने शहर, सिडको- हडको, जवाहर कॉलनी या परिसरातील गणेश मंडळांनी भंडारा आयोजित केला होता. यंदा १,२३६ गणेश मंडळांची नोंद झाली असून, त्यातील निम्म्या गणेश मंडळांनी भंडारा केला. अनेक कॉलन्यांमध्ये हॉलसमोर पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. या पंगतीत बसून कॉलनीवासीयांनी प्रसादाचा लाभ घेतला. प्रत्येक मंडळाने हजार पत्रावळी खरेदी केल्या होत्या. बड्या गणेश मंडळांनी आज चार ते पाच हजार पत्रावळी आणल्या होत्या. याशिवाय मोंढ्यातून १ लाखाच्या जवळपास द्रोण विक्री झाले. कासारी बाजार गणेश मंडळाच्या वतीने शहरातील मुख्य श्री विसर्जन मिरवणुकीत अन्नदान करण्यात येणार आहे. शहागंज, गांधी चौक येथे स्व. हुकूमशेठ भारुका मित्रमंडळातर्फे यंदा पोहे, शिऱ्याचे वाटप करण्यात येणार आहे. १९९० पासून हे मित्रमंडळ विसर्जन मिरवणुकीत अन्नदान करीत आहे.८ ठिकाणी श्री विसर्जनाची व्यवस्था सोमवारी अनंत चतुर्दशी असून आठ ठिकाणी श्री विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. महापालिकेने आज सायंकाळी टँकरने पाणीपुरवठा करून विहिरी भरल्या. २०० च्या आसपास टँकर विहिरींमध्ये सोडण्यात आले आहेत. ८ ठिकाणच्या मुख्य विसर्जन व्यवस्थेव्यतिरिक्त लहान- मोठ्या विहिरींमध्येही श्रींचे विसर्जन होईल. १५० मेट्रिक टन निर्माल्य जमा होण्याच्या शक्यतेमुळे मनपाने प्रत्येक ठिकाणी मोठ- मोठे बिन्स ठेवण्यात आले आहेत. चिकलठाणा, संघर्षनगर मुकुंदवाडी, संतोषी मातानगर, शिवाजीनगर, जालाननगर, औरंगपुरा, एन-१२ सिडकोसह यंदा पहिल्यांदाच अंबिकानगर येथे श्री विसर्जनासाठी विहीर बांधण्यात आली आहे. शहरात १२३६ नोंदणीकृत गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली असून जिल्हा गणेश महासंघ, नवीन औरंगाबाद, सिडको- हडको गणेश महासंघाच्या अधिपत्याखाली या मंडळांची नोंदणी केली आहे. सिडको-हडको सार्वजनिक गणेश महासंघाच्या वतीने सिडको एन-६ येथील आविष्कार कॉलनी चौकापासून श्री विसर्जन मिरवणुकीला दुपारी १ वाजता सुरुवात होणार आहे. येथेही सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात होईल. आविष्कार कॉलनीतून बजरंग चौकामार्गे टीव्ही सेंटर चौकातून पुढे मजनू हिल परिसरातील विसर्जन विहिरीपाशी मिरवणुकीची सांगता होणार आहे. गजानन महाराज मंदिर चौकापासून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे पाटील यांनी कळविली.
मिरवणूक मार्गांवरील वाहतुकीत बदल
By admin | Updated: September 8, 2014 00:33 IST