लातूर : लातूरकरांच्या एकजुटीचा परिचय करून देणाऱ्या ‘जलयुक्त लातूर’ या प्रकल्पाचे काम पाहून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर प्रभावित झाले. त्यांनी या कामाचे कौतुक करून हे काम निरंतर चालू राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवाय, या कामासाठी एक लाखाचा धनादेशही ‘जलयुक्त’ समितीकडे त्यांनी सुपूर्द केला.लातुरात पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहिले होते. त्याचा वृत्तांत वृत्तपत्रांतून वाचत होतो. या प्रकल्पास भेट द्यावी, कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी, अशी अनेक दिवसांपासूनची इच्छा होती. आज या प्रकल्पास भेट देण्याचा योग आला. नदीपात्रात साठलेले मुबलक पाणी पाहून मन भरून आले, अशा शब्दात चाकूरकर यांनी भावना व्यक्त केल्या. ‘जलयुक्त’ लातूर व्यवस्थापन समितीने केवळ एक वर्षासाठी नदीपात्रातील गाळ काढण्याचे, रूंदीकरणाचे काम केले असा समज कोणी करून घेऊ नये. यापुढील काळातही समितीला अनेक कामे करावी लागणार आहेत. यासाठी निधी लागतो. त्याची सुरूवात स्वत:पासून करावी म्हणून आपण एक लाखाचा धनादेश समितीकडे सुपूर्द करीत असल्याचे चाकूरकर यांनी यावेळी स्पष्ट केले. जलयुक्त लातूरच्या कामासाठी लातूरकरांनी यापूर्वी जशी भरभरून मदत केली, तशीच मदत यापुढील काळातही करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. साई, आरजखेडा, नागझरी येथे जाऊन कामाची पाहणी केली. यावेळी जलयुक्त समितीचे डॉ. अशोक कुकडे, अॅड. त्र्यंबकदास झंवर, मकरंद जाधव, माजी आमदार वैजनाथ शिंदे, निलेश ठक्कर, शिवदास मिटकरी, उदगीर लाईफ केअरच्या संचालिका डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
चाकूरकरांनी दिला ‘जलयुक्त’ला लाखाचा निधी
By admin | Updated: January 8, 2017 23:31 IST