परभणी: गंगाखेड तालुक्यातील डोंगर जवळा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची चार पदे मंजूर आहेत. शाळा सुरु होऊन पंधरा दिवस उलटूनही एकाच शिक्षकावर शाळेचा कारभार चालवला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांची रिक्त पदे भरावित यासाठी मंगळवारी विद्यार्थ्यांनी जि.प.सीईओंच्या दालनात शाळा भरविली. यामुळे अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली.गंगाखेड तालुक्यातील डोंगर जवळा येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. गावातील तब्बल ८० विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. तीन वर्षांपासून या शाळेतील या न त्या कारणावरुन शिक्षकांची पदे रिक्त राहत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा सुरु होऊन पंधरा दिवस उलटूनही या शाळेतील शिक्षकांची पदे भरण्यात आली नाहीत. शिक्षकांची पदे भरावित म्हणून जिल्हा परिषदेचे सीर्इंओ व शिक्षणाधिकारी यांच्याकडे वारंवार लेखी निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष केले गेले. शिक्षकांची तीन पदे भरावित या मागणीसाठी विद्यार्थी व पालकांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सीर्इंओच्या दालनात शाळा भरविली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करुन परिसर दणाणून सोडला. यावेळी शिक्षणाधिकारी आठवले यांनी निवेदन घेऊन तत्काळ शिक्षकांची पदे भरण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरपंच बबन मुंडे, सुभाष मुंडे, बाळासाहेब घरजाळे, शंकर घरजाळे, बालासाहेब पालके, बाळासाहेब मुंडे, ग्रामपंचायत सदस्या सुनंदाबाई घरजाळे, उषा घरजाळे, विठ्ठल घरजाळे, लक्ष्मण मुंडे, उद्धव घरजाळे, नितीन खोडवे आदींची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजीशिक्षक द्या, नुकसान टाळा, विद्यार्थ्यांनी दिलेल्या या घोषणामुळे जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला. ३० ते ३५ विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे शिक्षण विभागाचे धाबे दणाणले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस.डुंमरे हे कार्यालयात नसल्यामुळे दालनामध्ये विद्यार्थ्यांनी शाळा भरविली. काही वेळानंतर शिक्षणाधिकारी आठवले हे या ठिकाणी आले. त्यांनी विद्यार्थी व पालकांची म्हणणे ऐकून घेतले.
सीईओंच्या दालनात भरविली शाळा
By admin | Updated: July 2, 2014 00:15 IST