औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात खरीप हंगामातील नुकसान झालेल्या पिकांचा आढावा घेत पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक २० आणि २१ डिसेंबर रोजी मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहे. दोन दिवस विभागातील पाहणी करून त्याचा अहवाल दिल्यानंतर नॅशनल डिझास्टर रेस्क्यू फंड (एनडीआरएफ) मधून शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. मराठवाड्यात २६ लाख हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
एनडीआरएफच्या पथकाचा दौरा मंगळवारी सायंकाळी विभागीय आयुक्त कार्यालयाला प्राप्त झाला असून त्यामध्ये केंद्र व राज्यातील कृषी आणि मदत-पुनवर्सन विभागाच्या सचिव दर्जांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
मराठवाड्यातील ३६ लाख शेतकऱ्यांना २६०० कोटी रुपये भरपाईसाठी लागणार असल्याचा अंतिम अहवाल विभागीय प्रशासनाने शासनाकडे ऑक्टोबरमध्ये पाठविला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्याचे १३३६ कोटी रुपयांचे अनुदान शासनाने पाठविले.
विभागीय प्रशासनाच्या अंतिम आकडेवारीनुसार २६०० कोटींच्या आसपास मदत अतिवृष्टीग्रस्तांसाठी लागणार आहेत. यात खरीप हंगामातील पिकांसह फळबागांचा विचार केला आहे. १० हजार प्रति हेक्टरप्रमाणे २ हेक्टर मर्यादेत असलेल्या शेतीसाठी २४६२ कोटी आणि २५ हजार प्रति हेक्टर मर्यादा असलेल्या शेतीसाठी ८३ कोटी असे २६०० कोटी मदतीसाठी लागणार आहेत.
जिल्ह्यातील २ लाख ६५ हजार हेक्टर, जालना ४ लाख ९३ हजार, परभणी १ लाख ७९ हजार, हिंगोली २ लाख २७ हजार, नांदेड ५ लाख ६४ हजार तर बीडमधील २ लाख ५५ हजार हेक्टर, लातूर २ लाख ५० हजार, उस्मानाबाद जिल्ह्यातील २ लाख ५९ हजार असे २५ लाख हेक्टरच्या आसपास नुकसान पावसामुळे झाले आहे. जिरायत, बागायत, फळपिकांच्या पंचनाम्यांचा यात समावेश आहे.
जिल्हा बाधित शेतकरी अपेक्षित मदत
औरंगाबाद ३ लाख ७३६९८ २७८ कोटी १२ लाख
जालना ५ लाख ७९१९६ ५२४ कोटी ५३ लाख
परभणी २ लाख ५२१८५ १८० कोटी ३७ लाख
हिंगोली ३ लाख ७६२३ २२७ कोटी २८ लाख
नांदेड ७ लाख ४४०९ ५६५ कोटी १३ लाख
बीड ४ लाख ३२७०६ २५५ कोटी ९५ लाख
लातूर ४ लाख ३३०४२ २५० कोटी ३० लाख
उस्मानाबाद ३ लाख ९८८०५ २६४ कोटी ३० लाख
एकूण ३६ लाख २६०० कोटी रुपये