राजकुमार देशमुख, सेनगाव अगदी छोट्यातल्या छोट्या गावात, वाडी-तांड्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी आहेत, रस्ते आहेत; परंतु तालुक्याचे ठिकाण असलेल्या सेनगावात स्मशानभूमीच नसल्याने मृतांवर रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की ओढवली आहे. अत्यंत लाजीरवाणी बाब असलेला हा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडत पडला आहे. तालुका निर्मितीनंतर सेनगावच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. इतर ठिकाणांवरून ग्रामस्थ सेनगावात वास्तव्यास येत असून गावाचे शहरात रुपांतर होत असताना तालुक्याचे ठिकाण असलेल्या सेनगावात मूलभूत सुविधा मिळणे दुरापास्त झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. येथील सर्व धर्मियासाठी असणार्या स्मशानभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत चाळीस वर्षांपूर्वी उभारली होती. तेव्हापासून गावात स्मशानभूमीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून गावात सार्वजनिक स्वरुपाची स्मशानभूमी नसल्याने जुन्या गावातील विविध समाजाचे ग्रामस्थ भरवस्तीत सद्य:स्थितीतील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच प्रेतांवर अंत्यसंस्कार करतात तर नवीन वस्तीतील ग्रामस्थ हिंगोली रस्त्यावरील कयाधू नदीच्या काठावर अंत्यसंस्कार कार्यक्रम उरकतात. या दोन्ही ठिकाणी कोणत्याही स्वरुपाच्या सुविधा उपलब्ध नाहीत. शंभर, पन्नास ग्रामस्थांना उभे राहण्यासाठी जागा नाही, पावसाळ्याच्या दिवसांत तर पुसता सोय नाही. अख्ख्या गावात स्मशानभूमीचे एकही शेड नाही. एखाद्या कुटुंबात दु:खद घटना घडली तर त्या कुटुंंबप्रमुखाला अशासमयी अंत्यसंस्कार करण्यासाठी दु:ख बाजूला सारून जागेचा शोध घेण्याची लाजीरवाणी अवस्था झाल्याचे पहावयास मिळते. काही समाजातील व्यक्तींच्या मृत्यूनंतर दफनविधीसाठी वापरण्यात येणार्या जागेवरही अतिक्रमण झाले आहे. दफनविधीसाठी वापरण्यात येणार्या जागेचाही कोणताच विकास झाला नसून या ठिकाणी उकंड्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे सेनगावात एक प्रकारे प्रशासनाचे दुर्लक्ष व लोकप्रतिनिधींची अकार्यक्षमता यामुळे मृतांची एक प्रकारे अवहेलनाच होत आहे. स्मशानभूमीची समस्या सोडविण्यासाठी हतबल झालेल्या ग्रामस्थांनी मागणी करणेच सोडून दिले आहे. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याची तक्रार हिंगोली जिल्हा स्वतंत्र होण्याआधी परभणीत समावेश असलेल्या सेनगावात आजही स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांची प्रचंड अडचण होत आहे अगदी लहान गावातही स्मशानभूमी उपलब्ध असताना तालुक्याचे ठिकाण असलेल्या सेनगावात स्मशानभूमीच नसल्याचे चित्र आहे मृतांवर चक्क रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की सेनगावातील विविध समाजाच्या लोकांवर ओढवली आहे; विशेष म्हणजे अनेक दिवसांपासून हा प्रश्न कायम आहे स्थानिक लोकप्रतिनिधी, पुढारी या प्रश्नाकडे गांभिर्याने पाहत नसल्याने ही समस्या सुटलेली नाही; आता प्रशासनाने हा प्रश्न सोडविण्याची गरज आहे
सेनगावात स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर
By admin | Updated: May 11, 2014 00:37 IST