वेरुळ : येथील जगप्रसिद्ध कैलास लेणीच्या उजव्या बाजूकडील माथ्यावरील १२० मीटर लांबीच्या पृष्ठभागाला सिमेंट काँक्रिटीकरण केले जात आहे. परंतु, हे दुरुस्तीचे काम भूगर्भतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले जात नसल्याचे समोर आले आहे. परिणामी भविष्यात लेण्याला धोका निर्माण होण्याची भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
जागतिक वारसास्थळात समावेश असलेल्या वेरूळ लेण्यांच्या संवर्धनाची जबाबदारी भारतीय पुरातत्व विभागाकडे आहे. परंतु, या विभागातील अधिकारी लेण्यांच्या संवर्धनाचा विचार न करता मनमानी पद्धतीने दुरुस्तीच्या कामे करीत असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून लेण्यांच्या आवारात दुरुस्तीची कामे केली जात आहेत. यात कैलास लेण्याच्या उजव्या बाजूकडील माथ्यावर सिमेंट काँक्रिटीकरण केले जात आहे. परंतु, हे काम अयोग्य पद्धतीने होत असल्याचा आरोप पर्यावरण व पर्यटनप्रेमींकडून केला जात आहे. लेण्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने हे काम होत नसल्याने भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची भीती भूगर्भप्रेमींनी व्यक्त केली आहे. भूगर्भशास्त्रज्ञ व वास्तुशास्त्रज्ञांचे मार्गदर्शन न घेता पुरातत्व विभागाचे अधिकारी मनमानी पद्धतीने येथील दुरुस्तीचे कामे करीत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
----
मजुरांचा जीव धोक्यात
वेरूळ येथे सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी मजुरांना कुठल्याही प्रकारच्या सुरक्षा साधनांचा पुरवठा केला जात नाही. अकुशल कामगारांकडून दोनशे ते अडीचशे फुट उंचीवरील कामे करून घेतली जात आहे. काठावरील काम करण्याआधी जाळी लावणे गरजेचे आहे. परंतु, तशी कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
कोट
ऊन-वारा-पाऊस या तिनही ऋतूंचा सिमेंट कामावर विपरीत परिणाम होऊ शकतो. सिमेंट काँक्रिटीकरण आणि लेणी भागातील खडक यात अंतर तयार होऊन खडकास भेगा पडू शकतात. त्यामुळे भविष्यात लेण्याला हानी होऊ शकते. त्यामुळे हे बांधकाम भूगर्भशास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली होणे गरजेचे आहे.
- डॉ. मदन सूर्यवंशी, भूगोल, विभागप्रमुख, बामू औरंगाबाद.
कैलास लेण्यांच्या उजव्या बाजूकडील उंचीवरील पृष्ठभाग हा खराब होत आहे. या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. वरिष्ठांकडून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. - राजेश वाकलेकर, संवर्धन सहायक, भारतीय पुरातत्व विभाग.
180721\img_20210718_161009.jpg
वेरूळ लेणी परिसरातील कैलास लेणीच्या उजवीकडील माथ्यावर सिमेंट कॉंक्रीटीकरण केले जात आहे.