औरंगाबाद : पंतप्रधानांनी जाहीर केल्यानंतर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभरात विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. हैदराबाद मुक्तिसंग्राम स्वातंत्र्यलढ्याचा भाग आहे. या लढ्याचा अमृतमहोत्सव आगामी १७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. हे अमृतमहोत्सवी वर्ष विविध उपक्रमांनी साजरे केले पाहिजे, या मागणीचा ठराव ४१व्या मराठवाडा साहित्य संमेलनात मंजूर केला.
निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त होऊन स्वतंत्र भारतात सामील होण्यासाठी इथल्या जनतेने मोठा लढा दिला आहे. त्यामुळे एक वर्ष उशिराने का होईना, १७ सप्टेंबर १९४८ रोजी या प्रदेशाला स्वातंत्र्य मिळाले आणि हा प्रदेश भारतीय संघराज्याचा अविभाज्य भाग झाला. येत्या १७ सप्टेंबरपासून हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षाला सुरुवात होत आहे. या मुक्तिलढ्याची प्रेरक आठवण लोकांमध्ये कायम राहावी, या लढ्यातील हुतात्मे आणि स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण जागते राहावे, यासाठी येत्या वर्षी सुरू होणाऱ्या अमृतमहोत्सवी वर्षात शासकीय आणि अशासकीय स्तरांवर वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जावे, अशी मागणी हे साहित्य संमेलन करीत आहे. ‘मराठवाडा साहित्य परिषद’ ही या लढ्याचे हत्यार म्हणून स्थापन झालेली संस्था आहे. या संस्थेने मुक्तिसंग्रामात मोलाची भूमिका बजावलेली आहे. म्हणून वर्षभर सांस्कृतिक, भाषिक आणि वाङ्मयीन उपक्रम राबविण्यासाठी या संस्थेला राज्य व केंद्र शासनाने वर्षारंभीच विशेष अनुदान द्यावे, अशीही मागणी ठरावाद्वारे केली. याशिवाय संमेलनात एकूण दहा ठराव मंजूर करण्यात आले.
चौकट,
इतर मंजूर ठराव
- मराठी भाषा विकास प्राधिकरण स्थापन करावे.
- मराठी भाषा विद्यापीठ आगामी वर्षांपासून कार्यान्वित व्हावे.
- प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मराठी भाषा समिती स्थापन केल्याबद्दल शासनाचे अभिनंदन.
- समृद्धी महामार्गाला मराठवाड्यातील सर्वच जिल्हे जोडण्यात यावेत.
- सर्वच शाळांमध्ये मराठीला प्रथम भाषेचा दर्जा द्यावा.
- शेतकरीविरोधी धोरण तत्काळ थांबवावे.
- मराठी भाषिकांना रेल्वे विभागात नोकरी मिळावी.
- जागतिक वारसा असलेली वेरूळ, अजिंठा ही ऐतिहासिक स्थळे लोकल रेल्वेमार्गाने जोडावीत.