लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: देगलूर नाका परिसरातील ईदगाह मैदानावर सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता हजारो मुस्लिम बांधवांनी ईद - उल - फितरची सामूहिक नमाज अदा केली़ यावेळी देशाची एकात्मता व सलोखा कायम रहावा, यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली़ दरम्यान, जिल्ह्यात सर्वत्र रमजान ईद उत्साहात साजरी करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या़ विविध भागातील लहान मुले, तरूण व ज्येष्ठ मुस्लिम बांधव सकाळी ईदगाह मैदानाच्या दिशेने नमाज अदा करण्यासाठी घराबाहेर पडले़ सकाळी ९ वाजता ईदगाह मैदानात हजारो नागरिक उपस्थित होते़ मौलाना साद अब्दुल्ला यांनी ईद - उल- फितरची सामूहिक नमाज अदा केली़ तर मौलाना मोईन खासमी यांनी प्रवचन दिले़ तसेच देशातील एकात्मता, शांतता, बंधुभाव व प्रेम कायम रहावे, यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली़ नमाजनंतर प्रत्येकाने एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या़ आ़ डी़ पी़ सावंत, आ़ अमरनाथ राजूरकर, जिल्हाधिकरी अरूण डोंगरे, मनपा आयुक्त गणेश देशमुख , जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, नरेंद्र्र चव्हाण, किशोर स्वामी, पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर यांनी ईदगाह मैदान येथे उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या़ शहरात वेगवेगळ्या परिसरातील मशिदीत आज सकाळी ईद- उल - फितरची नमाज अदा करण्यात आली़ यामध्ये शिवाजीनगर येथील मशीद आबेदीन, निजाम कॉलनीतील मशीद खाजगान, किल्लारोड येथील जामा मशीद, अरबगल्लीतील दरबार मशीद, खडकपुरा येथील मशीद दुलेशाह रहमान, लेबर कॉलनीतील हजरत उमर फारेख मशीद, पीरबुऱ्हाणनगर येथील मशीद सालेहिन, मालेगावरस्ता येथील मशीद लिमरा, श्रीनगर येथील मशीद रफिया या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या़ त्यानंतर आप्तेष्टांना व मित्रांना शीरखुर्म्यासाठी आमंत्रित केले़
जिल्ह्यात ईद उत्साहात साजरी
By admin | Updated: June 27, 2017 00:25 IST